धमकी देणाऱ्याने सर्वप्रथम माझा इतिहास तपासावा, असे सांगत पीएमपीएमएलचे व्यस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कोणतेही निर्णय बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. मुंढे यांना काल पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. धमकी पत्रांना घाबरत नसून त्याकडे गांभीर्याने पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंढे यांनी पीएमपीएमएल कारभाराचा सद्य स्थितीचा आढावा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

मुंढे म्हणाले की, आतापर्यंतचे हे चौथे धमकी पत्र असून सर्व पत्रे एकाच व्यक्तीची असल्याचे लिखाणामधून दिसत आहे. या सर्व पत्राकडे भीतीने नव्हे तर गांभीर्याने पाहत असून राज्य शासनाने पोलीस सुरक्षा दिल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यात पीएमपीएमएलच्या प्रतिदिनी उत्पनात वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. एप्रिलमध्ये १ कोटी ३० लाखांच्या घरात असणारे उत्पन्न आगस्टमध्ये १ कोटी ६० लाख प्रतिदिन झाले आहे. तसेच प्रवासी संख्येत वाढ झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ८ लाख असणारी प्रवासी संख्या सध्या जवळपास ११ लाखांच्या घरात पोहोचली असल्याचे ते म्हणाले. नवीन निर्णयानंतर पीएमपीएलचे उत्पन्न, प्रवासी संख्या आणि बसेस वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पीएमपीएमएलला फायदा होत असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.

महिनाभरात मुंढे यांना दुसऱ्यांदा धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंढे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.