पिंपरी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलीसांनी घटनेनंतर काही तासातच अटक केली आहे. तथापि, हल्लेखोर अद्याप फरार आहेत. गोठा आणि केबल व्यवसायात त्रास देत असल्याच्या पूर्ववैमनस्यातून नगरसेवकाचा काटा काढल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमोल विठ्ठल वहिले (वय-२७, रा, वहिले चाळ, मोहननगर, चिंचवड) असे सूत्रधाराचे नाव आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. वहिलेचा मोहननगरमध्ये जनावरांचा गोठा आहे, हा गोठा तेथून हलवण्यासाठी टेकवडे दबाव आणत होते, त्यावरून त्यांच्यात वाद होते. त्याचप्रमाणे, वहिलेच्या केबल व्यवसायात टेकवडे सतत अडथळा आणत होते, यावरूनही त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. त्यातून नगरसेवकाचा कायमचा काटा काढण्याचा डाव त्याने रचला. आठ दिवस त्याने नगरसेवक टेकवडेंचा माग ठेवला. सकाळपासून ते रात्रीपर्यंतच्या हालचालींची सगळी माहिती एकत्रित करून अंतिम प्लान आखला. हल्लेखोरांना काम समजावून दिल्यानंतर तो बालाजीच्या दर्शनासाठी गेला. तिथूनही तो सूत्रे हलवत होता. खुनाच्या घटनेच्या आधी व नंतरही त्याचे आरोपींशी बोलणे होत होते. काम फत्ते झाल्याचे हल्लेखोरांनी त्याला कळवले. तेव्हा तो तिथून पुण्याकडे निघाला. दरम्यान, या संभाषणाचे पुरावे पोलीसांना मिळाले होते, त्यामुळे त्यांनी लोहगाव विमानतळावरच त्याला पकडले. हल्लेखोर अद्याप ताब्यात आलेले नाहीत. त्यांची नावे समजली आहेत. ते ताब्यात आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल. वहिलेला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

चप्पल आणि मोबाईलमुळे आरोपी गजाआड
पोलिसांना घटनास्थळी नंबर प्लेट नसलेली पांढरी संशयित दुचाकी, चप्पल सापडली होती, त्याचा शोध घेत गेल्यानंतर पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे, मुख्य सूत्रधाराच्या मोबाईलचे लोकेशन मिळत गेल्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आला.