गंभीर किंवा किरकोळ  गुन्ह्य़ात अटक केल्यानंतर महिला तसेच पुरुष आरोपींची न्यायालयाच्या आदेशाने पोलीस कोठडीत (लॉकअप) रवानगी होते. महिला आरोपींसाठी शहरात फक्त एक लॉकअप आहे. शहराच्या मध्यभागात फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या इमारतीत तळमजल्यावर महिलांसाठी लॉकअप आहे. या लॉकअपमध्ये चोरी, घरफोडी, खून अशा गंभीर गुन्ह्य़ांमधील आरोपी महिलांना ठेवण्यात येते.

पुणे शहरात पुरुष आरोपींसाठी फरासखाना, खडकी, लष्कर, येरवडा, पिंपरी येथे लॉकअप आहेत तसेच काही पोलीस ठाण्यांच्या आवारात स्वतंत्र लॉकअप आहेत. महिला आरोपींना ठेवण्यासाठी शहरात फक्त एक लॉकअप असून हे लॉकअप फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीतील तळमजल्यावर आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील या लॉकअप सर्वात मोठे आहे. तेथे एका वेळी शंभर महिला आणि दीडशे पुरुष आरोपी असे एकूण मिळून अडीचशे आरोपी ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. या लॉकअपमध्ये शहराच्या मध्यभाग तसेच उपनगरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्य़ांमधील आरोपींना ठेवण्यात येते. गुन्हे शाखेकडून पकडण्यात आलेल्या आरोपींना या लॉकअपमध्ये ठेवण्यात येते.

या लॉकअपमध्ये बऱ्याचदा पुरुष आरोपींना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे पोलिसांना अन्यत्र लॉकअप शोधावे लागते.

पुरुष आरोपींसाठी लॉकअपची सोय अन्य ठिकाणी उपलब्ध असली, तरी महिलांसाठी फक्त एक लॉकअप आहे. या लॉकअपमध्ये शंभर महिला आरोपींना ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. या लॉकअपमध्ये चोरी, पाकिटमारी, खून, मारामारी अशा गंभीर स्वरूपातील गुन्ह्य़ांतील महिला आरोपींना ठेवण्यात येते तसेच वेश्याव्यवसाय प्रकरणातील महिला आरोपींना तेथे ठेवण्यात येते.

याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सध्या तरी महिला आरोपींसाठी फक्त एक लॉकअप उपलब्ध आहे.

लॉकअपमध्ये सरकारी भत्ता

पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर आरोपींना नियमांप्रमाणे सरकारी जेवण देण्यात येते. कोठडीतील आरोपींना घरचे जेवण देण्याची परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे पोलीस कोठडीतील आरोपींना सरकारी भत्ता खाऊन न्यायालयाकडून जामीन मिळेपर्यंत दिवस काढावे लागतात.