मध्यपूर्व आणि आशियाई कला संस्कृतीचा प्रभाव असलेल्या पावणेदोनशे वर्षांपूर्वीच्या फर्निचरवरील कलाकुसर पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालयातील व्हिक्टोरियन शैलीतील या फर्निचर दालनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
सोफा, खुच्र्या, कपाटे आणि अर्धवर्तुळाकार टेबल या दैनंदिन वापरातील फर्निचरवर आकर्षक कलाकुसर हे या व्हिक्टोरियन शैलीचे वैशिष्टय़ आहे. १८३७ ते १९०१ या कालखंडातील पाच कपाटे, दोन सोफे, दहा खुच्र्या आणि अर्धवर्तुळाकार टेबल या छोटेखानी दालनामध्ये स्वतंत्रपणे मांडण्यात आले आहे. आकर्षक नक्षी आणि उत्कृष्ट कलाकुसरीचा नमुना असलेले हे फर्निचर गोवा आणि पुणे येथून संकलित करण्यात आले आहे.
या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संस्कृती निधीच्या (नॅशनल कल्चर फंड) प्रकल्प समन्वयक जोयोती रॉय, सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालक संजीवनी मुजुमदार, डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर आणि संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, व्हिक्टोरियन फर्निचरच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा जतन करून तो भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम होत आहे. त्याकाळी या कलेची समृद्धी होती याची जाणीव व्हावी आणि त्याविषयीचा अभिमान वाटावा अशीच ही कलाकुसर आहे.
संग्रहालयाच्या प्रस्तावित विकास प्रकल्पाचा आराखडा मंजूर झाल्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.

विकासासाठी निधीची आवश्यकता
बावधन येथील संग्रहालयाच्या प्रस्तावित विकास प्रकल्पासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या प्रकल्पासाठी संग्रहालयाने राष्ट्रीय संस्कृती निधीबरोबर परस्पर सामंजस्य आणि सहकार्य करार (एमओयू) केला आहे. त्यानुसार या विकास प्रकल्पासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांना आयकरामध्ये शंभर टक्के सवलत मिळू शकते. संग्रहालयाच्या विकास प्रकल्पासाठी आतापर्यंत १४ लाख ७५ हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून संपूर्ण विस्तारासाठी साधारणपणे ७५ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, अशी माहिती सुधन्वा रानडे यांनी दिली.