राज्यातील एस.टी कामगार विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच दिवसापासून बेमुदत संपावर आहेत. त्याच दरम्यान आज सकाळपासून स्वारगेट आगारात असलेल्या एस.टी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदाराच्या शिवनेरीमधून दादर आणि ठाण्याकडे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

एसटी कामगारांच्या या संपाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर भागातील वाकडेवाडी येथील एस.टी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कामगाराचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्या आंदोलनादरम्यान खासगी ट्रॅव्हल्स चालकांना आगारातून वाहतूक करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती.

काल ठिकठिकाणी आंदोलन झाल्याने, खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आगारातून सेवा देण्याचे बंद केले होते. मात्र आज पुन्हा सकाळपासून खासगी ट्रॅव्हल्स आणि एस.टी महामंडळाच्या ताफ्यात ठेकेदाराच्या ताब्यात असलेल्या गाड्यांमधून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकाकडून प्रवाशांची होणारी जादा दराची लूट थांबण्यास मदत झाली आहे. तर अद्यापही कामगार आंदोलनावर ठाम असून राज्य सरकारने लवकरात लवकरात एस.टी कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.