भरधाव वेगात असलेल्या ‘ऑडी’ने भर रस्त्यातच अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत ही लाखमोलाची कार अक्षरशा जळून खाक झाली. सुदैवाने कारचे मालक अनिल भारती हे वेळीच कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी होत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतला असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अनिल भारती हे त्यांच्या कार (क्रमांक एम.एच-१२ एच.एल-३००) द्वारे पिंपरीच्या दिशेने येत होते. दरम्यान, ऑटो क्लस्टरच्या समोरून कार जात असताना अचानक कारच्या समोरच्या भागातून धूर निघाला व काही क्षणातच कारने पेट घेतला. हे पाहून कार चालक अनिल भारती हे तात्काळ कारच्या बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

अवघ्या काही मिनिटांत कार पूर्णपणे जळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. गोविंद सरवदे यांच्यासह हनुमंत होके, विजय घुगे आणि संभाजी दराडे या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.