पिंपरी : शहरातील विविध भागांतील नऊ रस्ते विकासाच्या ९० कोटी रुपयांच्या निविदांमध्ये संगनमत (रिंग) झाल्याची तक्रार ठेकेदारांनीच केली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून दोषींवर कारवाईची मागणी होत असताना या तक्रारीवरून पालिका प्रशासनाने कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे.

महापालिकेने शहरातील विविध भागांतील नऊ रस्त्यांच्या ९० कोटींच्या कामाची निविदा आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध केली होती. या कामाच्या निविदा प्रक्रियेत अटी-शर्तीची पूर्तता करत नसताना काही ठेकेदार पात्र करण्यात आले. तर, पात्र असूनही काहींना अपात्र करण्यात आल्याचा आरोप करत ठेकेदारांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनीही आयुक्त सिंह व शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी या कामांच्या निविदांमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. काही पात्र ठेकेदारांनी खासगी विकासकाकडे काम केल्याचा पुरावा दाखल केला. कामाचे पुरेसे पुरावे व प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत.

हेही वाचा – बारामतीत अजित पवार पर्यायी उमेदवार?

पंधरा वर्षांपासून पालिकेचे काम करणारे ठेकेदार अपात्र ठरविण्यात आले. पात्र केलेल्या ठेकेदारांनी आवश्यक यंत्राची यादी व पुरावे दिलेले नाहीत. काही ठेकेद राजकीय व्यक्तीशी संबंधित असल्याचेही दिसून येते. ठेकेदाराचा स्वतःच्या मालकीचा ‘हॉटमिक्स प्लांट’ आवश्यक आहे. त्याची पूर्तता केलेली नसताना ठेकेदार पात्र ठरल्याचे दिसते. त्यामुळे याची चौकशी करून निविदा रद्द करावी. खोटी कागदपत्रे सादर करणारे ठेकेदार, त्यांची तपासणी करणारे सल्लागार व अधिकारी यांचे संगनमत असेल, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कलाटे यांनी केली.

हेही वाचा – दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज

काही कामांच्या निविदांबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने स्थापत्य विभागामार्फत संबधित पात्र व अपात्र ठेकेदारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई होईल. चुकीचे आढळल्यास नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाईल, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.