सुजित तांबडे, लोकसत्ता

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून पवार आणि भाजपकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या उमेदवार अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून खुद्द अजित पवार यांचाही उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार हे बारामतीचे ‘डमी’ उमेदवार असणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’

उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांकडून खबरदारी घेतली जात असते. छाननीमध्ये अर्ज बाद होऊ नये, यासाठी उमेदवारांकडून अर्जाची बारकाईने तपासणीही केली जाते. तसेच एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले जातात. तरीही उमेदवारी अर्ज काही कारणांमुळे रद्द झाल्यास प्रत्येक पक्ष किंवा उमेदवार हे आपला एक उ  पर्यायी उमेदवार म्हणून अन्य व्यक्तींचा दाखल दाखल करत असतात. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातून पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाने अर्ज घेण्यात आला आहेत. त्यांनी अर्ज दाखल केल्यास ते बारामतीतील पर्यायी उमेदवार असणार आहेत.

बारामती मतदारसंघाची निवडणूक ही अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे या मतदारसंघात चूरस निर्माण झाली आहे. पवार आणि महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगफटका होऊ नये, यासाठी अजित पवार यांच्याकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

शक्तिप्रदर्शनाची तयारी

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल आहे. त्यामुळे १८ एप्रिल रोजी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत. सुनेत्रा पवार, पुणे मतदार संघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी पुण्यात सभा घेतली जाणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सांगितले. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.