शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे. शुक्रवारीच पुणे महापालिकेने या संदर्भातली माहिती वृत्तपत्रात जाहिरात देऊन प्रसिद्ध केली होती. शनिवार वाड्यात फक्त महापालिका आणि अन्य सरकारी कार्यक्रमच होतील असेही महापालिकेच्या आयुक्तांनी म्हटले होते. पर्यटकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या निर्णयाला पुणे महापालिकेनेच स्थगिती दिली आहे.

मात्र या निर्णयावर प्रचंड टीकेचा भडीमार झाला. अखेर महापालिका आयुक्तांनी हा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालणे हा महापालिका आयुक्तांचा मनमानी कारभार आहे असा सूर लोकांमधून उमटला. तर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालायची की नाही याचे अधिकार सर्वसाधारण सभेचे आहेत, अशात आयुक्तांनी निर्णय कसा घेतला? असा प्रश्न विरोधकांनीही उपस्थित केला त्याचमुळे अखेर सगळ्या परिस्थितीपुढे नमते घेत महापौरांनी त्यांचा निर्णय मागे घेतला.

शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्वसाधारण सभेचा अधिकार आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत चर्चा होईल असे महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे. तसेच आयुक्तांनी घातलेली बंदी मागे घ्यावी असे पत्रही मुक्ता टिळक यांनी दिले होते. त्यानुसार ही बंदी हटवण्यात आली आहे. आयुक्तांना शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महागात पडला आहे. कारण या निर्णयाला चोवीस तास उलटण्याआधीच तो त्यांना मागे घ्यावा लागला आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पुण्यातील शनिवार वाडा या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमुळे गर्दी होते, बाजीराव रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, रहदारी वाढते त्यामुळे शनिवार वाडा बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांची निराशा होते म्हणून या ठिकाणी खासगी कार्यक्रम नकोत अशी भूमिका आयुक्तांनी घेतली होती. मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठल्याने त्यांना हा निर्णय अखेर मागे घ्यावा लागला.