सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा शोध

भवानी पेठ भागात व्यावसायिक कामानिमित्त आलेल्या परगावातील एका प्रवाशाची दोन लाखांची रोकड असलेली पिशवी रिक्षात विसरली. घाबरलेल्या प्रवाशाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्याने त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास करून ज्या रिक्षात पिशवी विसरली होती. त्या रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि दोन लाखांची रोकड प्रवाशाकडे सुपुर्द केली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल प्रवाशाने पोलिसांचे मनोमन आभार मानले.

प्रशांत दत्तात्रय तेली (वय २८) हे मूळचे सांगोल्यानजीक असलेल्या कडलस गावचे आहेत. फर्निचर व्यावसायिक असलेले तेली रविवारी कामानिमित्त पुण्यात आले होते. गणेश पेठेतील अल्पना चित्रपटगृहाच्या नजीक त्यांनी पहाटे रिक्षा थांबविली. तेलींबरोबर त्यांचा मित्र होता. दोघे जण रिक्षाने भवानी पेठेत निघाले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला भाडे दिले आणि रिक्षाचालक तेथून निघून गेला. गडबडीत तेली यांची दोन लाखांची रोकड असलेली पिशवी रिक्षात राहिली. घाबरलेल्या तेलींनी तातडीने रामोशी गेट पोलीस चौकीत धाव घेतली. तेली यांना रिक्षाचा क्रमांक देखील माहीत नव्हता. पोलीस चौकीतील पोलीस नाईक सचिन खाडे यांनी तातडीने या घटनेची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर यांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने रिक्षाचा शोध घेण्यास सुरुवात केली. भवानी पेठ, अल्पना चित्रपटगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात आले. रिक्षा क्रमांकावरून पोलिसांनी रिक्षामालकाचा पत्ता शोधला. पोलिसांनी रिक्षामालकाशी संपर्क साधला.तेव्हा रिक्षा संदीप कांबळे यांना चालविण्यास दिल्याचे सांगितले. पोलीस शिपाई खाडे, दावणे, कांबळे यांनी रिक्षाचालक कांबळेचा पत्ता शोधून काढला. दरम्यान, रिक्षाचालक कांबळे घरी येत होते. रिक्षाच्या मागील बाजूस प्रवासी पिशवी विसरल्याची माहिती कांबळेंना नव्हती. पोलिसांनी कांबळेंना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा रिक्षातील आसनाच्या मागील बाजूस ठेवलेली पिशवी सापडली. दोन लाखांची रोकड असलेली पिशवी पोलिसांनी तेली यांना परत केली. तेली यांनी पोलिसांचे मनोमन आभार मानले.