मोबाईलवर बोलत रस्त्याने निघालेल्या नागरिकांचे मोबाईल संच हिसकावून पसार होणाऱ्या चोरटय़ांना गुन्हे शाखेने पकडले. चोरटय़ांकडून चाळीस हजारांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

मोदीन महंमद शेख (वय १९, रा. श्रीराम कॉलनी, चिंचवड) आणि आफताब अल्ताफ पीरजादे (वय २०, रा. ओम कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटयांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्याने मोबाईलवर बोलत निघालेल्या नागरिकांचे मोबाईल संच हिसकाविण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून तपास करण्यात येत होता. मोबाईल चोरटय़ांची माहिती काढणारे सहायक निरीक्षक गणेश पाटील यांना शेख आणि पीरजादे यांनी मोबाईल हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. सापळा लावून पोलिसांनी दोघांना पकडले. या दोघांनी निगडी परिसरात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

शेख आणि पीरजादे यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून मोबाईल हिसकाविण्याचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, अन्सार शेख, उपनिरीक्षक विलास पालांडे, दिलीप लोखंडे, राजू मचे, प्रमोद वेताळ, राजेंद्र शेटे, संजय गवारे, धर्मराज आवटे, संतोष बर्गे, प्रवीण दळे, गणेश काळे, अमित गायकवाड, प्रमोद हिरळकर यांनी ही कारवाई केली.