रेल्वेच्या अर्थसंकल्पात पुण्याला मागील दोन वर्षांपासून काहीही मिळाले नसताना अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात हावडा- पुणे या वातानुकूलित गाडीसह तीन नव्या गाडय़ा जाहीर झाल्याने काहीसे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुणे- बारामती व पुणे- अहमदनगर या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचाही समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. पुणे- मुंबई दरम्यान गाडय़ा वाढविण्याबरोबरच लोकलसेवा वाढविण्याबाबतच्या मागणीला मात्र नेहमीप्रमाणे डावलण्यात आले आहे.
रेल्वेमंत्री मल्लीकार्जुन खरगे यांनी रेल्वेचा अंतरिम अर्थसंकल्प बुधवारी जाहीर केला. नव्या गाडय़ांमध्ये विविध ठिकाणी प्रीमियम वातानुकूलित गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यातील हावडा-पुणे ही गाडी पुण्याच्या वाटय़ाला आली आहे. ही गाडी आठवडय़ातून दोनदा धावणार असून, नागपूर व मनमाड मार्गाने जाईल. गोरखपूर- पुणे ही आठवडय़ातून एकदा धावणारी व लखनौ, कानपूर, बिना व मनमाड मार्गाने जाणारी गाडीही पुण्यासाठी देण्यात आली आहे. पुणे- लखनौ ही आठवडय़ातून एकदा धावणारी व खंडवा, भोपाळ, बिना, झाँसी, कानपूर या मार्गाने जाणारी गाडीही अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.
नव्या गाडय़ांबरोबरच नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणामध्ये पुणे विभागाच्या तीन मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. पुणे- बारामती व्हाया सासवड, जेजुरी व मोरगाव त्याचप्रमाणे पुणे- अहमदनगर व्हाया केडगाव व अष्टी या मार्गाच्या सर्वेक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कराड, केडगाव, लेणारे, पंढरपूर या मार्गाचाही उल्लेख करण्यात आला. कोल्हापूर- पुणे या सध्या एकेरी असलेल्या लोहमार्गाचे दुहेरीकरणाच्या विषयाचाही रेल्वे अर्थसंकल्पात समावेश आहे.
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांबरोबरच पुणे- मुंबई दरम्यान गाडय़ांच्या संख्येत वाढ करावी. त्याचप्रमाणे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे- लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या संख्येमध्ये वाढ करावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी आहे. त्या मागणीबाबत याही रेल्वे अर्थसंकल्पात कोणताही विचार करण्यात आलेला नाही.
रेल्वे अर्थसंकल्पाबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा म्हणाल्या की, नव्या गाडय़ांच्या मार्गावर गाडय़ांची गरज होती. त्यामुळे काही न मिळण्यापेक्षा हे बरे आहे. मात्र, अनेक मागण्यांबाबत विचार झालेला नाही. नव्या बोग्यांमध्ये पुण्याला किती मिळणार, याचे उत्तर नाही. मार्गाच्या विद्युतीकरणामध्ये पुणे- मनमाड, सोलापूर, कोल्हापूरचा समावेश नाही.