घटस्फोट देण्याची मागणी करणाऱ्या पती, सासू, सासऱ्याच्या छळामुळे महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना खराडी भागात घडली. आत्महत्या करणारी महिला पुण्यात शिक्षणासाठी आली होती. या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पती, सासू, सासरे तसेच तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मानसी यादव (वय २७, मूळ रा. मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती भूपेंद्र यादव (वय ३०), सासरे मुलायमसिंग (वय ५२), सासू राजकुमारी (वय ५०, सर्व रा. मध्य प्रदेश) आणि मित्र शिरीष शहा (वय ३३, रा. मांजरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसीचे वडील संदीप फुलसिंग यादव (वय ५०, रा. उत्तर प्रदेश) यांनी या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानसी पुण्यात उच्चशिक्षणासाठी आली होती. पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर तिची जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिरीष शहा याच्याशी ओळख झाली. दोघेजण एकत्रच राहत होते.

दरम्यान, पती, सासू, सासऱ्यांनी मानसीला घटस्फोट देण्यास सांगितले. आरोपी शहा याने मानसीकडे विवाहाची मागणी करीत तगादा लावला होता. त्याने तिच्याकडे पैशांचीही मागणी केली होती. आरोपींनी केलेल्या छळामुळे मानसीने ५ एप्रिल रोजी चंदननगर भागात नदीपात्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले. तिची समजूत काढण्यात आली. त्यानंतर रात्री मानसीने रात्री साडेआठच्या सुमारास दहाव्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. मानसीच्या वडिलांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. छळामुळे तिने आत्महत्या केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे तपास करत आहेत.