पुण्यात कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर, या बाळाची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे या दुचाकीवरून बाळाला रूग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या महिला पोलिस अधिकार्‍याचे विशेष कौतुक केले जात आहे.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात बाळाला कोणीतरी टाकून दिले असल्याची माहिती आज(दि.१८) सकाळच्या सुमारास नागरिकांनी आम्हाला दिली. तात्काळ घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे यांनी धाव घेतली. मधुरा कोराणे यांनी तिथून बाळाला घेऊन ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून आता बाळाची प्रकृती ठणठणीत आहे व उपचार सुरू आहेत. आसपासच्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाला टाकून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बघा व्हिडिओ :-

दरम्यान, घटनास्थळावरून सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे या बाळाला दुचाकीवरून घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या महिला अधिकार्‍याचे विशेष कौतुक केले जात आहे.