मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही अलिशान गाडी चालवणाऱ्या अल्पवीयन मुलाने दोघांना चिरडले. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर अनेक धक्कादाक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर, आता महाराष्ट्र परिवहन विभागानेही या अल्पवयीन आरोपीविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वयाच्या साडेसतराव्या वर्षी पोर्श कार चालवून दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला आता त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पीटीआयला यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. मद्याच्या नशेत वाहन चालवल्याप्रकरणी कलम १८५ अन्वये नवीन गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या अल्पवयीन आरोपीला आज बालन्याय मंडळात हजर करण्यात आले.

१२ महिन्यांसाठी पोर्श कारची नोंदणीही रद्द

भीमनवार यांनी मंगळवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, कल्याणी नगरमध्ये रविवारी झालेल्या अपघातात सहभागी असलेल्या लक्झरी वाहनाची तात्पुरती नोंदणी मोटार वाहन (MV) कायद्याच्या तरतुदींनुसार रद्द करण्यात येणार असून पुढील १२ महिन्यांसाठी कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

हेही वाचा >> Pune Porsche Accident : कोट्यवधी किमतीच्या मोटारीची नोंदणी फक्त १७५८ रुपयांमुळे अपूर्ण

बंगळुरू ते पुणे पोर्श कारचा प्रवास

ही मोटार बंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीची किंमत पावणेदोन ते अडीच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तेथील वितरकाने या मोटारीची तात्पुरती नोंदणी करून ती पुण्यात पाठविली. मोटारीची तात्पुरती नोंदणी १८ मार्चला झाली होती. या नोंदणीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वैध आहे. पोर्श मोटार पुण्यात आल्यानंतर १८ एप्रिलला नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. त्या वेळी तिची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मोटारीची किंमत काही कोटी रुपयांच्या घरात असली, तरी ती इलेक्ट्रिक मोटार असल्याने नोंदणी शुल्क फारसे नाही. नोंदणीसह इतर शुल्क अशी केवळ १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरून ही नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत होती.

पोर्शचे नोंदणीचे शुल्क (रुपयांत)

– बँक शुल्क – १५००

– नोंदणी प्रमाणपत्र – २००

– टपाल खर्च – ५८

– एकूण शुल्क – १७५८

भीमनवार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, पुणे आरटीओला एमव्ही कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिस तक्रार नोंदवण्यास सांगितले होते. दरम्यान, परिवहन विभागाच्या आणखी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, पोर्श १२ महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल.