scorecardresearch

निर्यातक्षम द्राक्ष बागांना पावसाचा फटका

अवेळी पाऊस आणि अचानक बदललेल्या हवामानामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून, नुकताच मोहर लागलेल्या बागांचा मोहर जागच्या जागीच पाण्याने सडून जाऊ लागल्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांना पावसाचा फटका

बहर आलेल्या बागांचीही मोठय़ा नुकसानीची शक्यता

तानाजी काळे

इंदापूर : अवेळी पाऊस आणि अचानक बदललेल्या हवामानामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून, नुकताच मोहर लागलेल्या बागांचा मोहर जागच्या जागीच पाण्याने सडून जाऊ लागल्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांचे आगर समजल्या जाणाऱ्या बोरी येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांच्या बहराचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यांमध्ये सध्या काढणीयोग्य परिपक्व झालेल्या फळांचेही मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना हे नुकसान सहन होणारे नसून, करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व देशातील अनेक बाजारपेठा मागील हंगामात बंद झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला. उत्पादित झालेला शेतमाल शेतामध्ये सडून गेला. त्यामुळे मिळेल त्या किमतीने शेतमाल जागेवर देण्याची वेळ आली. काही ठिकाणी तर निर्यातक्षम द्राक्ष वाहनांमधून शेतकऱ्यांना गावोगावी आठवडी बाजारात किंवा गावोगावी विकावी लागली. अशा नुकसानीला सलग दोन वर्षे शेतकरी सामोरा जात असताना या वर्षी नुकताच हंगाम सुरू होत असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे बोरी येथील निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादक व प्रगतिशील शेतकरी सुभाषराव शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मागील सात-आठ वर्षांपूर्वी बोरी गावामध्ये अवेळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी देशाचे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार त्याचबरोबर श्रीनिवास पवार शर्मिला पवार यांनी भल्या सकाळी बोरी गावात द्राक्ष बागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता,अशी आठवणही सुभाषराव शिंदे यांनी सांगितली.

अलीकडच्या काळात द्राक्ष पिकाच्या नवनवीन जाती विकसित झाल्यामुळे द्राक्ष बागायतदार आपापल्या सोयीनुसार व बाजारपेठेतील अभ्यास करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अभ्यास करून द्राक्ष पिकांचे बहार धरले जातात. मात्र या अशा लहरी हवामानामुळे प्रत्येक टप्प्यातील बागांना फार मोठा तडाखा बसलेला आहे.

शेतकऱ्यांना मदतीची मागणी

सलग दोन वर्षे करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अनेक पातळय़ांवर अडचणीत आहे .या परिस्थितीमध्ये द्राक्ष, कांदा, भाजीपाला व अन्य पिकांवर या अवेळी पावसाचा, बदलत्या हवामानाचा अनिष्ट परिणाम झाला असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी पळसदेव-रूई येथील द्राक्ष बागायतदार आदिनाथ तुळशीराम काळे पाटील यांनी केली आहे.

द्राक्षांच्या अनेक परिपक्व बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबरमध्ये बहार धरण्यात आलेल्या बागा आता मोहरामध्ये आहेत. या मोहरामध्ये पाणी साचल्याने फळांच्या छोटय़ा कळय़ा जागेवरच सडू लागल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादनाचे प्रमाण कमी होणार आहे .त्याचप्रमाणे अशा खराब हवामानाला तोंड देताना, औषधांची फवारणी, खते हा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये कमालीची वाढ होत आहे

सुभाषराव शिंदे, द्राक्ष बागायतदार

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या