शहरातील तीन हजार गृहनिर्माण संस्थांमध्ये यंत्रणा कार्यान्वित; पाणी समस्या सुटण्यास मदत

पुणे : उन्हाळ्यामध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणी घेताना मोजावी लागणारी जास्त किंमत, टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या शुद्धतेबाबतची शंका या पाश्र्वभूमीवर शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता शहरातील अनेक सोसायटय़ांनी आता स्वत:ची पर्जन्य जलसंधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणा कार्यान्वित केली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात तीन हजार सोसायटय़ांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली असून त्यामुळे अनेक सोसायटय़ांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.

शहराची भौगोलिक स्थिती, पाणी वितरणातील त्रुटी आणि असमानता यामुळे शहराच्या काही भागांत पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होते. अनेक लहान मोठय़ा सोसायटय़ांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून रहावे लागते. पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन सन २००२ नंतरच्या इमारतींना ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे बंधन राज्य शासनाने घातले आहे. महापालिकेने सन २००७ नंतरच्या इमारतींमध्ये पर्जन्य जलसंधारण यंत्रणा कार्यान्वित करण्याचा ठराव केला. या पाश्र्वभूमीवर प्रारंभी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यास सोसायटय़ांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. मात्र अलीकडच्या दोन वर्षांत अन्य प्रकल्पांऐवजी पर्जन्य जलसंचय व्यवस्थापन करण्यात अनेक सोसायटय़ा आग्रही राहिल्याचे चित्र आहे. शहरात तीन हजार सोसायटय़ांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. केवळ सोसायटय़ाच नव्हे तर महाविद्यालये, शाळा, रुग्णालये यांच्याकडूनही ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाणी टंचाईच्या पाश्र्वभूमीवर अनेक सोसायटय़ांना महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणीपुरवठय़ाबाबतही अनिश्चितता असल्यामुळे अनेक सोसायटय़ा खासगी टँकरद्वारे पाणी घेत होत्या. त्यासाठी काही वेळा टँकरसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे आता बहुतांश सोसायटय़ांनी पर्जन्य जलसंधारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे निरीक्षण पर्जन्यजल संधारण या विषयात गेली सोळा वर्षे काम करणारे निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी नोंदविले. अडीचशेहून अधिक सोसायटय़ांना त्यांनी पर्जन्य जलसंधारण व्यवस्थापनासाठीची तांत्रिक मदत केली असून राज्यभरातही साडेसहाशे गावात त्यांच्या पुढाकारातून ही यंत्रणा यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटय़ांना मिळकतकरामध्ये काही सूट दिली जाते. यात पर्जन्य जलसंधारण व्यवस्थापनाचाही समावेश आहे. त्यामुळे अन्य प्रकल्पांपेक्षा ही यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जात आहे.

विमाननगर येथील लुकंड ग्रीन लॅण्ड -२ या बहुमजली इमारतीला पाण्याची समस्या जाणवत होती. त्यामुळे सन २००२ मध्ये प्रथम चार हजार चौरस मीटर आणि त्यानंतर सन २००३ मध्ये आठ हजार चौरस मीटर अशा एकूण बारा हजार चौरस मीटर क्षेत्रावर पर्जन्य जलसंधारणाचे व्यवस्थापन करण्यात आले. पाण्याची समस्या असताना दरदिवशी तीन टँकर मागवावे लागत होते. हे प्रमाण पर्जन्य जलसंच्यानंतर शून्यावर आले आहे. ही यंत्रणा 2कार्यान्वित करताना पाण्याची पातळी २२५ फूट खाली होती.

– शशिकांत दळवी, लुंकड ग्रीन लॅण्ड इमारत, अध्यक्ष