पुणे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दिवसभर उन्हाचा चटका अद्याप तीव्र असताना काही भागांत पावसाळी स्थितीही निर्माण झाली आहे. बहुतांश भागांत पुढील काही दिवस दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. पुढील दोन दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान किंचित कमी होणार असले, तरी किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
देशाच्या वायव्येकडील राज्यांतील उष्णतेची तीव्र लाट आणि तेथून महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट आली. विदर्भात सोमवारीही (४ एप्रिल) काही भागांत उष्णतेची लाट कायम होती. तर उर्वरित महाराष्ट्राचे तापमान सरासरीच्या पुढेच होते. त्यामुळे उन्हाचा चटकाही कायम आहे. त्यातच सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्या भागातून देशात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. समुद्रातून काही प्रमाणात बाष्पही येत आहे. परिणामी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि त्यानंतर पावसाळी स्थिती, असे दुहेरी वातावरण अनेक ठिकाणी आहे.
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा या भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. अकोल्यात सोमवारी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावतीचे तापमान ४३ अंशांवर होते, तर वाशिम, वर्धा, बुलढाणा आदी भागांत ४१ अंशांपुढे तापमान होते. मराठवाडय़ात परभणीत ४२.२ अंश, तर औरंगाबाद, नांदेडचे तापमान ४० ते ४१ अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रात नगर आणि जळगावमध्ये कमाल तापमान ४३ अंशांपुढे आहे. नाशिक आणि सोलापूरमध्ये ४० ते ४१ अंश, तर पुण्यात ४० अंशांच्या आसपास तापमान आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या पुढे आहे. रात्रीचे किमान तापमान सध्या सरासरीच्या पुढे जात असून, त्यात राज्यभर वाढ होण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज..
दिवसा उन्हाच्या चटक्यांसह राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. काही भागांत ढगांचा गडगडाट आणि सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.