पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी एका आलिशान पोर्श कारने बेदरकारपणे एका दुचाकीला धडक दिली. त्यामुळे या दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही कार चालवणारा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता असं त्याला पकडणाऱ्या स्थानिकांनी सांगितलं होतं. त्यानुसार अपघात घडला त्याचदिवशी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीत फेरफार केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाने मद्यप्राशान केलं नव्हतं असा अहवाल दिला होता. मात्र अपघाताच्या काही मिनिटे आधी त्या मुलाने दोन पब आणि बारमध्ये जाऊन मद्यप्राशन केलं होतं. त्याचे सीसीटीव्ही व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करून ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागातील दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनानेदेखील पोलिसांप्रमाणे ढिलाई दाखवल्याचा आरोप पुण्यातील कसबा पेठ विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या रक्ताच्या अहवालात फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आपल्याला रक्त तपासणीचे अहवाल अवघ्या काही तासांत मिळतात. मात्र या प्रकरणात ७ दिवस होऊनही ते अहवाल मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता.”

रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे की, “याच ससून रुग्णालयात मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवागृहात ठेवा, आमची रुग्णवाहिका येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला नकार दिला होता. असो, हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलं आहे, जे आता हळू हळू जगासमोर येतील.”

हे ही वाचा >> “ते लोक माझा खून…”, पुणे अपघातावरून रॅप करणाऱ्या आर्यनचा कारवाईनंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल

नेमकं प्रकरण काय?

अपघाताला जबाबदार असलेल्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केलं होतं का ते तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यावेळी अल्कोहोल न घेतलेल्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून दाखवण्यात आले होती. परिणामी अहवालात त्याच्या शरीरात अल्कोहोल नसल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच्या रक्ताची पुन्हा तपासणी करण्यात आली. दुसऱ्यांदा झालेल्या चाचणीत त्याच्या शरीरात अल्कोहोल आढळलं. त्याचबरोबर, डीएनए चाचणीत दोन्ही चाचण्यातील रक्त नमुने वेगवेगळे असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे अल्पवयीन आरोपीचा वाचवण्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पुराव्यांमध्ये छेडछाड केली असल्याचा संशय तपासकर्त्यांना आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून आज ससूनच्या फॉरेन्सिक विभागातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे.