Premium

“चंद्रकांत दादांना गणरायाने सुबुद्धी देवो, मतदारसंघासाठी…”, आमदार रवींद्र धंगेकरांची गणपती बाप्पांना ‘ही’ मागणी

रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. मात्र ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असतात.

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil
"चंद्रकांत दादांना गणरायाने सुबुद्धी देवो, मतदारसंघासाठी…", आमदार रवींद्र धंगेकरांची गणपती बाप्पांना 'ही' मागणी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे – आपल्या लाडक्या गणरायाचे प्रत्येकाच्या घरी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले. तर अनेकांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीची सजावट केल्याची पाहण्यास मिळत आहे. तर या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. मात्र ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असतात. या निमित्ताने रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवासह, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

हेही वाचा – नारळ विक्रेत्यांना गणेशोत्सव लाभदायी! पुणे-मुंबईत दररोज ७० ते ८० लाखांहून विक्री 

रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम पाहिले आणि आता विधिमंडळात कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा प्रतिनिधी आमदार म्हणून काम करीत आहे. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम करित आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक होताच अधिवेशनाला सामोरे गेलो. त्यावेळी सभागृहातील सर्वच पक्षांतील नेतेमंडळीनी विशेष सहकार्य केल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

कसबा विधानसभा मतदारसंघातील अनेक कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र त्यापैकी १० कोटी पर्वती विधानसभा मतदारसंघात आणि ५ कोटी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात हा निधी वळविण्यात आला. या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना माझा निधी देण्यात आला आहे. पण ही कुरघोडी माझ्यावर नाही, तर माझ्या मतदारावर त्यांनी केली आहे. भाजपाने माझ्या मतदारांवर उगारलेला सूड आहे. माझ्याकडे पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी जरी नसला तरी मी काम करीत आहे. त्यामुळे आज गणरायाकडे एकच मागणी करतो, ती म्हणजे चंद्रकांत दादांना गणरायाने सुबुद्धी देवो आणि मतदारसंघासाठी लवकरात लवकर निधी मिळो, अशी प्रार्थना करित रवींद्र धंगेकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

आताच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि ते आपल्याच जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे मतदारसंघातील निधीबाबत लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज ही नागरिक ‘व्हू इज धंगेकर’च म्हणतात

कसबा विधानसभा पोटनिवडणूक ही अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्या निवडणुकीदरम्यान चंद्रकांत पाटील हे एका भाषणांत ‘व्हू इज धंगेकर’ म्हणाले होते. त्याची चर्चा सर्वत्र झाली आणि मी विधिमंडळात पाऊल ठेवले. त्यावेळी सभागृहातील आमदारांनी हात उंचावून ‘व्हू इज धंगेकर’ असा आवाज दिला. आजदेखील कुठे ही गेलो तरी नागरिक व्हू इज धंगेकर असच म्हणतात, अशी भूमिका मांडत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमदार रवींद्र धंगेकर यांनी टोला लगावला.

पंतप्रधानांचे स्वागत करू,पण..

आगामी पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आमच्या पक्षात अनेक नेते इच्छुक आहेत, पण काँग्रेस पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास मी निवडणूक लढविण्यास सज्ज आहे आणि निश्चित लढणार आहे. पण काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू झाली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करू, पण निवडणूक आम्हीच जिंकू, असा विश्वासदेखील यावेळी रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरून पळ काढू नये

केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारचा कारभार जनतेने पाहिला आहे. प्रत्येक निवडणुकीत घोषणा करायच्या आणि नंतर सर्व विसरून जायचे. भाजपा नेत्यांनी राज्यातील मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत प्रत्येक समाजात उद्रेक पाहण्यास मिळत असून उपोषणाला नागरिक बसले आहेत. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने केवळ आश्वासन देऊन पळ काढू नये. तर आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. त्याबरोबर ओबीसी समाजाला आणखी कोणत्या प्रकारे फायदा होईल, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे.

हेही वाच – वाहन परवाने, ‘आरसी’ मिळण्यास विलंब… पुणेकरांनी पाठवले सेवा हमी आयुक्तांना ‘हे’ पत्र

देशातील लोकशाही धोक्यात आली

आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. त्यानुसार देशातील कारभार चालू आहे, पण मागील काही महिन्यांपासून सर्व नियम, कायदे बाजूला ठेवून केंद्र आणि राज्य सरकार काम करित आहे. अनेक तपास यंत्रणा पाठीमागे लावून अनेक आमदार सत्ताधारी पक्षात घेत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. पण आगामी काळात सत्ताधारी पक्षाला जनता त्यांची जागा निश्चित दाखवेल, असा विश्वास आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा

सप्टेंबर महिना होत आला तरीदेखील राज्यातील अनेक भागांत पाऊस झाला नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तर जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. तर राज्यातील सर्व भागांत जोरदार पाऊस होऊ दे, अशी गणरायाकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravindra dhangekar comment on chandrakant patil made this demand to ganpati bappa svk 88 ssb

First published on: 21-09-2023 at 10:57 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा