पुणे : राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी- सीईटी) सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत लाखभर विद्यार्थी वाढले असून, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) १८ विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यानुसार काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या आहेत, तर काही अभ्यासक्रमांची नोंदणी पूर्ण झाली आहे. काही अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. एमएचटी-सीईटीसाठी गेल्या वर्षी सहा लाख ३६ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा सात लाख २५ हजार ६४० झाली आहे. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विधी (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ८० हजार १२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पाच वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी आतापर्यंत ३३ हजार ८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

हेही वाचा…पुण्यात वर्षभरात टँकरच्या ४ लाख फेऱ्या

शिक्षणशास्त्र (बी.एड.) अभ्यासक्रमाची ७२ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवीसाठी (एमबीए) एक लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी एक लाख १२ हजार २०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तसेच एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३८ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली.

हेही वाचा…पुणे : बांधकामेही पिताहेत पिण्याचे पाणी, पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात निकषांचे अडथळे

यंदा पहिल्यांदाच बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ११ हजार ८९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठीच्या नोंदणीची मुदत ११ एप्रिल असल्याने विद्यार्थिसंख्या वाढणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record number of students register for mhtcet competition intensifies pune print news ccp 14 psg
Show comments