मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली पीएमपीकडून बाजीराव रस्ता मार्गे संचलनात असलेल्या मार्गांमध्ये बदल केल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि अन्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाल्याने पीएमपी प्रशासनावर टीका करण्यात आली. त्यामुळे अखेर बाजीराव, शिवाजी रस्त्यावरील चार मार्ग पूर्ववत करण्याचा निर्णय बुधवारी पीएमपी प्रशासनाने घेतला. या निर्णायाची अंमलबजावणी उद्यापासून (गुरुवार, ४ ऑगस्ट) होईल.

मार्केटयार्ड-पिंपळे गुरव, मार्केटयार्ड-कासारवाडी रेल्वे स्थानक, कात्रज-पिंपळेगुरव, कात्रज गुजरवाडी-चिंचवड गाव या मार्गावर धावणाऱ्या गाड्या जाताना बाजीराव रस्त्याने आणि येताना शिवाजी रस्त्याने धावतील. या चार मार्गावर एकूम २८० फेऱ्या होणार आहेत. तसेच स्वारगेट ते शिवाजीगर या मार्गावर सुरू असलेल्या चोवीस पुण्यदशम गाड्यांच्या ७१४ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे त्यामुळे बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कात्रज ते शिवाजीनगर, मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव, मार्केटयार्ड ते कासारवाडी रेल्वे स्थानक, कात्रज ते पिंपळे गुरव, स्वारगेट ते सांगवी, मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा, कात्रज गुजरवाडी ते चिंचवड गांव या मार्गावरील गाड्या दांडेकर पूल, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि येताना जंगली महाराज रस्ता मार्गे टिळक रस्ता तर सहकारनगर ते संगमवाडी, सहकारनगर ते नरवीर तानाजी वाडी आणि अप्पर डेपो ते सुतारदरा या मार्गावरील गाड्यांचे संचलन टिळक रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि येतना जंगली महाराज रस्त्यामार्गे टिळक रस्त्याने करण्यात आले होते. त्यामुळे एकूण ५०८ फेऱ्यांच्या मार्गात बदल झाला होता. त्यावरून प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली होती. विद्यार्थी, नोकरदार, व्यावासयिक यांना त्रास सहन करावा लागत हता. त्यामुळे अखेर पीएमपी प्रशासनाकडून चार मार्ग पूरर्वत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.