विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मत

सीमेवर प्राणांची बाजी लावून जवान लढत असताना आणि वेळप्रसंगी देशासाठी बलिदान करत असताना त्यांच्या कामगिरीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करतात, ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरीत  व्यक्त केली.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व भोजापूर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांच्या मातोश्री वृंदा मुन्नागीर गोसावी यांना मुंडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे, विश्वनाथ लांडे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे, विक्रांत लांडे आदी उपस्थित होते. यावेळी मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे ‘भारतापुढील संरक्षण सज्जतेची आव्हाने’ या विषयावर व्याख्यानही झाले.

मुंडे म्हणाले, सीमेवर सतत हल्ले सुरू आहेत. मात्र, वीर जवानांमुळे आपण देशवासीय सुरक्षित आहोत. येणाऱ्या काळात ज्या सैनिकांमुळे संपूर्ण देश सुरक्षित राहतो, त्याचे श्रेय सैनिकांनाच जाणे आवश्यक आहे. मात्र, ते आता देशातील राज्यकर्त्यांना जाणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. देशासाठी आहुती देणाऱ्या जवानाच्या स्मृतीला वंदन करता आले, वीरमातेचा आपल्या हस्ते गौरव झाला, हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे. प्रास्ताविक विलास लांडे यांनी केले. निवृत्ती शिंदे यांनी आभार मानले.