श्रीराम ओक 

नेत्रहीनांनादेखील वाचनाची आवड जोपासता यावी, यासाठी आपल्या डोळसपणाची जाण ठेवत सरोज टोळे यांनी ब्रेल लिपी अवगत करण्यापासून त्याद्वारे विविध पुस्तकांचीच नाही, तर दिवाळी अंकांचीदेखील निर्मिती केली. ब्रेल शिकण्याची इच्छा असणाऱ्या अनेकानेक महिलांना त्यांनी मोबदल्याविना शिकवले, त्यातून घडलेल्या त्यांच्या विद्यार्थिनीदेखील नेत्रहीनांसाठी विविध प्रकारचे कार्य करीत आहेत.

Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार”
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

आपल्याला दैनंदिन जीवनात कोणतेही काम करताना, त्या कामाचे कोणते ना कोणते फळ अपेक्षित असते. आर्थिक स्वरुपापासून प्रसिद्धीपर्यंत किंवा समोरच्यावर आपला प्रभाव पाडण्यासाठी, तर एखाद्याला उपकाराचे ओझे वाटावे यासाठीसुद्घा काही कार्य केले जाते. असे असले तरी दैनंदिन जीवनात आणि सामाजिक कार्यातदेखील नि:स्पृह कार्य करणारी मंडळी अभावाने का होईना भेटतात. प्रसिद्धीपासून दूर आणि फक्त कर्म करीत राहायचे या भावनेतून काम करणाऱ्या अशा नि:स्पृह मंडळींमध्ये आवर्जून नाव घ्यावे लागेल ते सरोज सुधीर टोळे यांचे.

आपण सामाजिक कार्य करावे असा कोणताही विचार मनात नसताना सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी १९९४ मध्ये त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. सुरुवातीला वस्तीपातळीवरील महिलांनी एखादी कला शिकावी आणि चार पैसे त्यांच्या गाठीस बांधले जावेत, या उद्देशाने फरच्या पर्सेस आणि अशाच काही वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले. केवळ इतकेच करुन त्या थांबल्या नाहीत, तर त्याच्या विक्रीव्यवस्थेतदेखील त्या हिरिरीने सहभागी झाल्या.

वडील मो.रा.वाळंबे यांच्याकडून मराठी शुद्धलेखनाबरोबरच सामाजिक कार्याचे बाळकडू सरोजताईंना मिळाले. त्यांच्या घरी साहित्यिकांचे जसे येणेजाणे असे, तसेच गरजू मंडळींचे वार लावून जेवायला येणेदेखील असे. वडील आणि आई यांच्याकडून सामाजिक कार्याची तसेच वाचनाची शिदोरी घेऊनच त्या घडत होत्या.

आपल्या सामाजिक कार्याच्या वाटचालीत अंधजनांसाठी काही कार्य करावे, अशी प्रेरणा त्यांना मिळाली. सरोजताईंनी ब्रेल लिपीतून मुलांसाठी पुस्तके तयार करण्याचे कार्य हाती घेतले. त्यासाठी त्यांनी आईने केलेल्या आर्थिक मदतीने ब्रेलर विकत घेतला आणि प्रयत्नपूर्वक ब्रेल त्या शिकल्या आणि कार्य सुरु केले. ब्रेलमध्ये पुस्तके त्या बनवू शकत होत्या, पण वाचू शकत नव्हत्या.

यासाठी देखील त्यांनी अपार कष्ट घेतले आणि त्यांना ब्रेल वाचता येऊ लागले. वाचनाची आवड डोळस व्यक्तींना जशी असते, तशीच ती अंधांनादेखील असते, ही जाणीव ठेवून त्यांनी २००० पासून विविध विषयांवरील पुस्तके ‘फुलोरा ब्रेल प्रकाशन’ या संस्थेमार्फत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तयार करण्यास सुरुवात केली. तेच कार्य आजही अपेक्षाविरहित पण त्याहीपेक्षा जास्त जोमाने सुरु आहे. लेख, गोष्टी, कविता, गाणी, नाटक, चरित्र, माहिती, अनुभव, स्फूटलेखन, बोधकथा, आठवणी, बडबड गीतं, विनोद, विविध स्तोत्रे, निवेदनासह गीतरामायण, अगदी कोडीसुद्धा या प्रकाशनामार्फत ब्रेलमधे तयार केली. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी व इतर भाषांत मिळून त्यांनी दोनशेच्यावर पुस्तके ब्रेल केली असून त्यात अनेक धार्मिक ग्रंथांचादेखील समावेश आहे. या प्रकाशन संस्थेमार्फत २००२ पासून म्हणजे मागील १५ वर्षे अंध बालमित्रांसाठी ‘फुलोरा’ हा ब्रेल दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येतो. तो अंक डोळस व्यक्तींना वाचता यावा, यासाठी हस्तलिखित स्वरुपातील मजकूरदेखील त्यात असतो. याशिवाय आकर्षक व नेत्रहीनांनाही वाचता येईल असे उठावांनी युक्त असे मुखपृष्ठ असलेला हा अंक अंध व्यक्ती आणि काही संस्थांना मोफत पाठविला जातो. त्यांनी नुकतेच स्टिफन हॉकिंग्ज यांच्यावरील विविध बातम्या, लेख यांचे संपादन करुन अंधजनांना प्रेरणादायक व्हावे, या उद्देशाने अपंगत्वाचा आशादायी उल्लेख करीत एका पुस्तकाची निर्मिती केली आहे.

डोळस व्यक्तींना ब्रेल लिपी शिकवणे, हे या प्रकाशनाचे एक महत्त्वाचे कार्य. यात मागील दोन-तीन वर्षांमध्ये २५ हून अधिक गृहिणी शिकून तयार झाल्या आहेत व ब्रेल लेखनाचे कार्य करीत आहेत. या सर्व कामांसाठी संस्थेला पंचवीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये शुद्धलेखनाचे दोष राहणार नाहीत, याची काळजी घेतात, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे.

सुरुवातीच्या काळात ब्रेल पुस्तकांची निर्मिती करणे हे खूप जिकिरीचे काम होते. एकाच पुस्तकाच्या अनेक प्रती करण्यासाठी सगळी मेहनत पुन्हा करावी लागे व ते वेळखाऊदेखील होते. पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे एकदाच संगणकावर तयार करुन ठेवलेल्या पुस्तकाच्या हव्या तेवढय़ा प्रती काढणे सहजसाध्य झाले आहे. संगणकावर मजकूर घेऊन प्रिंटआऊट काढताना अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. या वेळी आळंदी येथील जागृती अंध मुलींच्या शाळेने सरोजताईंना प्रिंटआऊट काढण्याच्या संदर्भात मोलाचे सहकार्य केले. तेथे जाण्यायेण्यासाठी दिवसभराचा वेळ व येताना काढलेल्या प्रिंटआऊटचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन येणे असे जरासे अवघडच कार्य त्या नेटाने करीत होत्या.

सुरुवातीच्या काळात नेत्रहीन मित्रमैत्रिणींना तयार केलेली पुस्तके त्यांना हव्या त्या जागी पोचविण्याचे कार्यदेखील त्यांनी नेटाने केले. त्यांच्या या कार्यात पती सुधीर यांच्यासह मुलांनी जे सहकार्य केले, ते अवर्णनीय आहे. त्यांच्या या कार्याला समाजाकडून हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांच्या घरी येऊन अनेकांनी त्यांच्याकडून पुस्तकांची एक-एक प्रतदेखील करुन दिली. आपले नेत्रहीन बांधव, मित्र यांनीदेखील वाचावे अशी इच्छा असणारे ९८८१४९५४०३ या क्रमांकावर सरोजताईंशी संपर्क साधू शकतात.

पूर्वी वजनाला, तसेच उंचीलादेखील अधिक असणारी ही पुस्तके हाताळण्यास सोपी जावीत यासाठीदेखील सरोजताईंनी विविध क्लृप्त्या लढविल्या. वाढत्या वयात बदलत्या तंत्रज्ञानाला कवेत घेत, नेत्रहिनांच्या उत्कर्षांसाठी झटणाऱ्या या सरोजताई अनेकानेकांसाठी वरदायिनी ठरली आहे, असे म्हणल्यास वावगे ठरु नये.

shriram.oak@expressindia.com