‘छत्रपती शाहू महाराजांच्या कल्पना, त्यांनी पाहिलेले स्वप्न, त्यांची तत्त्वे आणि त्यांनी समाजाला दिलेली दिशा या सर्व गोष्टी आज आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती शाहू महाराजांसारख्या राजांमुळेच समाज घडत असतो’, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात शनिवारी व्यक्त केले.
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर चंचला कोद्रे, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती, उपाध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, सचिव मालोजीराजे छत्रपती आदी उपस्थित होते.
या वेळी मुखर्जी म्हणाले,‘‘मुघल साम्राज्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने रयतेला त्यांचा राजा मिळाला, त्यानंतर तीनशे वीस वर्षांनी त्याच ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी आणि रयतेला आपला वाटावा असा त्याच घराण्यातील राजा शाहू महाराजांच्या रूपाने मिळाला; हे अचंबित करणारे आहे. समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच एक मार्ग आहे, हे त्यांनी जाणले होते. शाहू महाराजांनी केलेले कार्य हे समाजाला दिशा देणारे होते. देशात शाहू महाराजांनी आरक्षणाची पद्धत रूढ केली. शाहू महाराजांसारखे जनतेचे राजेच समाज घडवतात. त्यांचा आदर्श ठेवून त्यांची तत्त्वे आचरणात आणण्याची गरज आहे.’’
राजर्षी शाहू बँकेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे. तेरा फूट उंचीचा हा पूर्णाकृती पुतळा शिल्पकार संजय परदेशी यांनी साकारला आहे.