शरद पवार यांची अपेक्षा
इतिहासाचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे, मात्र त्यामध्ये गुरफटून राहू नका. इतिहासाच्या घोषणा देण्याऐवजी नवी समृद्ध पिढी घडविण्यासाठी ज्ञान विज्ञानाचा गजर करावा, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
शिवसह्य़ाद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पवार यांच्या हस्ते ‘हमाल पंचायती’ला प्रदान करण्यात आलेला शिवसह्य़ाद्री पुरस्कार कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव स्वीकारला. ‘सोनाई ग्रुप’चे अध्यक्ष दशरथ माने, ‘स्वयम्’ उपग्रहाची निर्मिती करणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चमू आणि शाहीर राजेंद्र कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, प्रवीण गायकवाड, फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र कोंढरे उपस्थित होते. पवार म्हणाले,की छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या नावाने घोषणा दिल्या जातात. त्याविषयी अभिमान आणि आदर आहे. पण, नवी पिढी घडविताना नव्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. घोषणा देणे योग्य असले तरी सध्याच्या परिस्थितीत त्या घोषणा किती उपयुक्त ठरणार आहेत? त्यापेक्षा ज्ञान आणि विज्ञानाचा स्वीकार करून कर्तृत्ववान समाज उभा करण्यासंबंधीची खबरदारी घेतली पाहिजे. हमाल पंचायत ही एक संस्था नसून तो एक उपक्रम असल्याचे सांगून बाबा आढाव म्हणाले, माथाडी कामगार कायद्यामध्ये हमालांचा समावेश केला जावा. हमालांचा आíथक बोजा सरकारवर पडत नसतानाही सरकार त्यांच्यासंदर्भात एवढे उदासीन का? असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा मंजूर झाला. पण, ओळखपत्राखेरीज काही मिळालेले नाही. दिल्लीत स्थापलेल्या राष्ट्रीय हमाल पंचायतीच्या नावातून ‘राष्ट्रीय’ हा शब्द काढून टाकण्याची केंद्राने अट ठेवली आहे. आमदार, खासदारांना वेतन वाढवून देण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी आहे, पण अपंगांसाठी ९०० कोटी रुपये देण्यासाठी पसे नाहीत,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बापट आणि जगताप यांनी आपल्या मनोगतातून आढाव यांच्या कार्याची प्रशंसा केली.