कौटुंबिक न्यायालयाने मुलांना ठणकावले

मुलगा आणि सुनेकडून दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे ८० वर्षांच्या पित्याने कौटुंबिक न्यायालयात तक्रार दिली. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकाला दिलासा दिला असून मुलांना ठणकावले आहे. पित्याचा सन्मानपूर्वक सांभाळ करा, असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने नुकतेच दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर मुले नरमली असून, त्यांनी पित्याचा सांभाळ करण्यास सुरुवात केली आहे.

या संदर्भात ज्येष्ठ नागरिकाने कौटुंबिक न्यायालयात सन २०१४ मध्ये तक्रार दिली होती. त्याच्या वतीने अ‍ॅड. हेमंत झंझाड, अ‍ॅड. नितीन झंझाड, अ‍ॅड. साकेत लोंबर, अ‍ॅड. रवींद्र मुदगुले यांनी काम पाहिले. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक धनकवडी भागात राहायला आहेत. स्वकष्टातून त्यांनी मुलांना उभे केले. त्यांचे विवाह करून दिले. धनकवडी भागात एक इमारत बांधली. इमारतीतील काही खोल्या भाडय़ाने दिल्या आहेत. त्याचे दरमहा भाडे मिळते. दोन मुले आणि सुनांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने त्यांनी कौटुंबिक न्यायालयात तक्रार दिली होती. पित्याला दरमहा सहा हजार रुपये द्यावेत, असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले होते. मात्र, मुलांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. उलट त्यांनी पित्याला घराबाहेर काढले.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिकावर उपासमारीची वेळ आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दरमहा रक्कम मिळावी, असा अर्ज ज्येष्ठ नागरिकाने कौटुंबिक न्यायालयात काही महिन्यांपूर्वी सादर केला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाकडून दोन्ही मुलांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पित्याचा सांभाळ का करत नाही, असा जाब न्यायालयाने विचारून मुलांना ठणकावले. पित्याचा सन्मानपूर्वक सांभाळ करा, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर मुले नरमली आणि पित्याचा सांभाळ करतो, अशी हमी न्यायालयाला दिली. त्यानंतर पित्याने न्यायालयात दाखल केलेला अर्ज मागे घेतला.