सिम्बायोसिसमधील विद्यार्थ्यांचे संशोधन

पुणे : करोना विषाणू संसर्गामुळे परस्पर अंतर (पर्सनल डिस्टन्सिंग) हा परवलीचा शब्द सर्वाच्याच परिचयाचा झाला आहे. मात्र गडबडीमध्ये अनेकदा अंतर राखण्याचा विसर पडतो. हे अंतर राखण्याची आठवण करून देण्यासाठी सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधील (एसआयबीएम) मंगेश ठोकळ या विद्यार्थ्यांने खास उपकरणाची निर्मिती केली आहे.

सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या इनोव्हेशन अँड आंत्रप्रुनरशिप विभागातर्फे नवसंकल्पना स्पर्धा (इनोव्हेशन स्पर्धा) आयोजित करण्यात आली होती. त्यात मंगेश ठोकळने परस्पर अंतर राखण्यासाठी आठवण करून देणाऱ्या उपकरणाची संकल्पना प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली. पारितोषिकाच्या रूपाने मिळालेल्या एक लाख रुपयांचा मंगेशने भांडवल म्हणून वापर करून या संकल्पनेचे प्रत्यक्ष प्रारूप तयार केले. अधिक संशोधन करून तयार झालेले उपकरण सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांना सादर केले. त्यानंतर संस्थेच्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून या उपकरणाचे उत्पादन सुरू करण्यात आले. उपकरणाचे संशोधन आणि निर्मितीसाठी संस्थेचे संचालक डॉ. रामकृष्ण रमण, डॉ. संदीप भट्टाचार्य, प्रा. योगेश ब्राह्मणकर, प्रा. अर्जुन पांचाल, प्रा. प्रवीण क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. आता हे उपकरण विक्रीसाठीही उपलब्ध करण्यात आले आहे, असे मंगेशने सांगितले.

करोना संसर्ग टाळण्यासाठी के ंद्र सरकारने दोन मीटर अंतर राखण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या उपकरणात दोन मीटर अंतर निश्चित करण्यात आले आहे. उपकरणात सेन्सरचा वापर करण्यात आला असून, उपकरणात निश्चित केलेल्या अंतर पाळले न गेल्यास उपकरण आवाज करून अंतर राखण्याची आठवण करून देते. कंपन्या, कामाच्या ठिकाणी हे उपकरण उपयुक्त आहे. या उपकरणासाठी साधारणपणे महिनाभर संशोधन के ले.

– मंगेश ठोकळ, संशोधक विद्यार्थी