सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणारा तारादूत प्रकल्प सुरू करण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील सारथी कार्यालयाबाहेर तारादूत सेवकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आता नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत आमचे प्रश्न प्रलंबित असताना देखील आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे दादा तारादूत सेवकांना न्याय द्या अशी मागणी तारादूत सेवकांचे नेतृत्व करणारे सदाशिव भुतेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा, तारादूतांना नियुक्त्या मिळाल्याच पाहिजेत’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

यावेळी सदाशिव भुतेकर म्हणाले की, “राज्यातील अनेक भागात तारादूत सेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून मागील कित्येक महिन्यांपासून सारथी संस्थेमार्फत चालविण्यात येणारे प्रकल्प बंद अवस्थेत होते. सारथी संस्था पुन्हा नव्याने चालवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्यामुळे आमचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. अगदी सुरुवातीला आम्हाला निधीदेखील मंजूर केला गेला. तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठवून तारादूताची नियुक्ती करावी आणि प्रकल्पाची व्याप्ती वाढवून प्रकल्पाला गती द्यावी, या मागणीची सरकारने दखल घ्यावी. अन्यथा आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार”.

“राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही निवडून दिले आहे. तरी देखील आमच्यावर अन्याय करणार का?,” असा सवालदेखील त्यांनी विचारला.