‘शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यातील शिक्षकांना थेट नियुक्ती दिल्या आहेत. उर्वरित रिक्त जागांवर पात्र उमेदवारांना सामावून घेण्यासाठी गरज असल्यास शासन निर्णयात बदल करण्यात येतील. शिक्षक भरती निवडणुकीपूर्वीच करून दाखवू,’ असा दावा शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी केला.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलच्या रौप्यमहोत्सवपूर्ती कार्यक्रमात शेलार बोलत होते. महापौर मुक्?ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर, उपकार्यवाह प्रकाश दीक्षित आदी या वेळी उपस्थित होते.

‘देशात तीस वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण तयार होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वावरणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांनी त्यावर हरकती-सूचना पाठवाव्यात. व्यापक मंथनातून तयार होणाऱ्या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल,’ असेही शेलार म्हणाले.

डॉ. एकबोटे यांनी शिक्षकभरतीनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची आणि वेतनेतर अनुदान सुरू करण्याची मागणी केली.