एरंडवणे, कोथरूड भागातून सायकल चोरणारा अटकेत

बिगारी काम झेपत नसल्याने एका परप्रांतीय तरुणाने एरंडवणे आणि कोथरूड भागातील क्लासच्या परिसरात लावलेल्या महागडय़ा सायकल चोरण्याची शक्कल लढविली. गेल्या सहा महिन्यांत त्याने जवळपास सात महागडय़ा सायकल या भागातून चोरल्या आणि घरात दडवून ठेवल्या. सायकल चोरीचे गुन्हे वाढल्याने पोलिसांनी चोरटय़ाचा माग काढण्यास सुरुवात केली. संशयावरून एरंडवणे भागात पकडलेल्या एकाने त्याच्या घरात चोरलेल्या सायकली  ठेवल्याची माहिती दिली. त्याच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या सात सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी अलंकार पोलिसांकडून गोवर्धनप्रसाद ललवा साहू (वय ३०, सध्या रा. केळेवाडी, कोथरूड, मूळ रा. भोडसा, जि. उमरिया, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोथरूड, एरंडवणे, कर्वेनगर भागातील क्लासच्या बाहेर लावलेल्या सायकली चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली  होती. चोरीला गेलेल्या सायकली महागडय़ा होत्या. या प्रकरणी तक्रारदारांनी अलंकार तसेच कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तपास पथकातील पोलीस शिपाई योगेश बडगे यांना संशयित चोरटय़ाची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून साहूला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने सात सायकली चोरल्याची कबुली दिली.

साहू चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आला होता. त्याने एका हॉटेलमध्ये रखवालदार म्हणून नोकरी केली होती. ही नोकरी सुटल्यानंतर त्याने बिगारी काम करण्यास सुरुवात केली. पत्नी आणि मुलाबरोबर तो केळेवाडी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहात होता. बिगारी काम झेपत नसल्याने त्याने सायकली चोरण्यास सुरुवात केली. कर्वेनगर भागातील युनायटेड वेस्टर्न सोसायटी, पोतनीस परिसर, कोथरूड भागात तो पायी फिरायचा. तेथील क्लासच्या बाहेर लावलेली  महागडी सायकल चोरून तो पसार व्हायचा. गेल्या सहा महिन्यांत त्याने सात सायकली चोरल्या असून, केळेवाडीतील दोन खोल्यांच्या घरात ठेवल्या होत्या.

चोरलेल्या सायकली मध्य प्रदेशात विकण्याचा डाव

महागडय़ा सायकलींवर चोरटय़ांचा डोळा असतो. काही सायकलींची किंमत पन्नास हजारांपर्यंत असते. क्लास तसेच सोसायटीच्या आवारात लावलेल्या सायकली चोरून त्याची विक्री केली जाते. यापूर्वी शहराच्या मध्यभागातून तसेच एरंडवणे भागातून सायकल चोरणाऱ्या चोरटय़ांना अटक करण्यात आली होती. अलंकार पोलिसांकडून सायकल चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला चोरटा साहूकडून सात सायकल जप्त करण्यात आल्या असून, या सायकलींची तो मध्य प्रदेशात विक्री करणार असल्याची कबुली त्याने दिली.