मावळ भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कामशेत येथे लोहमार्गाखालील भराव वाहून गेल्याने ठप्प झालेली रेल्वेची वाहतूक शनिवारी सुरळीत झाली. सकाळी काही गाडय़ांना उशीर झाला व काही गाडय़ा रद्दही कराव्या लागल्या, मात्र दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. त्याचप्रमाणे द्रुतगती मार्ग व महामार्गावरील वाहतूकही सुरळीत झाली आहे.
जोरदार पावसामुळे कामशेत येथे पुणे- मुंबई लोहमार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या विविध गाडय़ा रद्द कराव्या लागल्या होत्या. पावसाने उघडीप दिल्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, या भागातून मंद गतीने गाडय़ा जात असल्याने लांब पल्ल्याच्या काही गाडय़ांना चार ते पाच तासांचा विलंब झाला. पुणे- मुंबई दरम्यानच्या व लांब पल्ल्याच्या गाडय़ांना अग्रक्रम देण्यात येत होता. दरम्यान, पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व महामार्गावरील वाहतूकही पाऊस थांबल्याने शनिवारी पूर्ववत झाली. या मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.