शिक्षकांच्या भरतीसाठी ‘यूजीसी’चे विद्यापीठ, महाविद्यालयांना स्मरणपत्र

उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची कमतरता हा चिंतेचा विषय असून, उच्च शिक्षणातील गुणवत्तावृद्धीसाठी तातडीने त्यावर उपाय शोधणाची आवश्यकता आहे.

रिक्त पदे, आरक्षण, जाहिरात आदी तपशील सादर करण्यास ३१ डिसेंबरची मुदत 

पुणे : उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची कमतरता हा चिंतेचा विषय असून, उच्च शिक्षणातील गुणवत्तावृद्धीसाठी तातडीने त्यावर उपाय शोधणाची आवश्यकता आहे. त्यासाठी तातडीने रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे केली आहे. तसेच रिक्त पदांची संख्या, आरक्षण, जाहिरात आदी तपशील ३१ डिसेंबपर्यंत सादर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. 

 देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षक हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक नसल्याने गुणवत्ता वाढवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसीने दोन वर्षांत सर्व रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिले होते. रिक्त पदांवरील भरतीबाबत २०१९ मध्ये यूजीसीकडून चार परिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतरही रिक्त पदांचा प्रश्न सुटलेला नसल्याने यूजीसीने पुन्हा रिक्त पदे भरण्याचे स्मरण करून दिले आहे.

 यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंना शिक्षक भरतीसंदर्भात पत्र लिहिले आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी. शिक्षकांची रिक्त पदे हा चिंतेचा विषय असून उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक भरतीचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी रिक्त पदांवर शिक्षकांची भरती करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षकांच्या सर्व रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश यूजीसीकडून देण्यात आले आहेत. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून केवळ २ हजार ८८ पदेच भरण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्यात होत नसल्याचे चित्र आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ugc universities colleges recruitment teachers ysh