भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मिलींद एकबोटेंच्या परिवाराला धमकीची पत्र मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अज्ञात व्यक्तींनी एकबोटेंच्या निवासस्थानी ही पत्र धाडली असून, या पत्रात एकबोटेंना अटक केलेल्या बातम्यांची कात्रण आणि त्याखाली “संपूर्ण एकबोटे परिवाराला तोफेच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा”, अशा आशयाचा संदेश लिहीला आहे. या प्रकरणी एकबोटेच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे.

या पत्रामागे मोठं षडयंत्र असल्याची शक्यता वर्तवत, भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या दिवशी एकबोटे आपल्या राहत्या घरी असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. एकबोटेंवर याआधीही न्यायालय परिसरात हल्ला करण्यात आला होता. संजय वाघमारे नामक इसमाने एकबोटेंवर शाई फेकत त्यांना इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे यात एकबोटेंना कोणतीही इजा झाली नव्हती. या सर्व घटना लक्षात घेऊन एकबोटे कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी, मिलींद एकबोटेंच्या कुटुंबियांनी केली आहे. सध्या मिलींद एकबोटे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे एकबोटे कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात हे पहावं लागणार आहे.