शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणातील पाण्यात गढूळतेचे प्रमाण वाढले आहे. हे पाणी शुद्ध करून शहरात पुरवले जात असले, तरी नागरिकांनीही काही दिवस पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील हे पाणी सध्या गढूळ असून शुद्धीकरण केंद्रांमध्ये येत असलेल्या पाण्यातही गढूळतेचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील गढूळतेचे प्रमाण वाढल्यामुळे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये प्रक्रिया करूनच त्यानंतरच शहरात त्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांनी हे पाणी पुढील काही दिवस गाळून आणि उकळून घ्यावे, असे पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.