लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात मोठी घट झाल्याने संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा आठ दिवस विस्कळीत झाला होता. आता आंद्रातून पूर्वीप्रमाणे ८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण, पाणीटंचाईच्या तक्रारी कायम आहेत. थेरगाव, वाकड भागातून पाणीटंचाईच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने नळाला थेट मोटार लावून पाणी घेणाऱ्या रहिवाशांवर धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १९ मोटारी जप्त केल्या आहेत.

मागील चार वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. एप्रिल, मे महिन्यात अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होते. त्यातच आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात मोठी घट झाली होती. चार दिवस अवघे २१ एमएलडी पाणी शहरासाठी मिळाले होते. ५९ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी समस्या भीषण झाली होती. झपाट्याने विस्तारत असलेल्या वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, चऱ्होली, मोशी, डुडुळगाव या उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली होती.

आणखी वाचा-जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात

महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार पूर्वीप्रमाणे ८० एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र, तक्रारी कायम आहेत. अपुरा, कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारींचा ओघ महापालिकेच्या ‘सारथी हेल्पलाइन’वर सुरूच आहे. तक्रारी वाढल्याने पालिकेने पवना धरणातून १० एमएलडी पाणी अधिकचे उचलण्यास सुरुवात केली आहे.

शहरासाठी दिवसाला ६१५ एमएलडी पाणी

शहरवासीयांना मावळातील पवना धरणातून आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १५ असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. त्यानंतरही पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत.

१९ मोटारी जप्त

सांगवी भागात नागरिकांकडून नळाला थेट मोटार लावून पाणी घेतले जात होते. त्यामुळे परिसरातून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने पाहणी केली. नळाला थेट मोटार लावून पाणी घेणाऱ्या १९ मोटारी जप्त केल्या असून, कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

आणखी वाचा-अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार

कर्मचारी निवडणूक कामात

पाणीपुरवठा विभागामधील २०० पैकी ७०पेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारी निकाली काढण्यात विलंब होत आहे. आंद्रा धरणातून मिळणारे पाणी पूर्ववत झाले आहे. नळाला मोटार लावून पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पुरेसे कर्मचारी नसल्याने कारवाईला मर्यादा येत असल्याचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्याची सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली आहे. त्यांच्या जागी राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply has been restored but complaints of water shortage are still continue pune print news ggy 03 mrj
First published on: 11-04-2024 at 10:47 IST