पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये, संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आता सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठ आता कागदविरहित प्रक्रियेकडे जात असून, ऑनलाइन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घरबसल्या कागदपत्रे मिळणार आहेत.

विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडून (स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटर) विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे दिली जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठात सादर करावी लागते. या प्रक्रियेत बराच वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने राबवण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. तसेच अधिसभा सदस्यांनीही त्याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर विद्यापीठाने नेमलेल्या परीक्षासुधार समितीच्या माध्यमातून आता ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाइन आणि कागदविरहित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना ट्रान्स्क्रिप्टसाठी ऑनलाइन सुविधा देण्यात येणार आहे, तर पुढील टप्प्यात पदवी प्रमाणपत्र, परदेशातील विद्यापीठांत प्रवेशासाठी आवश्यक गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, उत्तीर्णता प्रमाणपत्र अशी कागदपत्रे दिली जाणार आहेत. विद्यापीठाच्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा विभागाकडून त्या संदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यानंतर ती कागदपत्रे विद्यार्थ्यांच्या ‘स्टुडंट प्रोफाइल’मध्ये उपलब्ध होतील. त्यानंतर ती कागदपत्रे विद्यार्थ्यांना डाउनलोड करून घेता येतील.

हेही वाचा >>>पिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, की विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कागदपत्रे, प्रमाणपत्रांची प्रक्रिया कागदविरहित करण्याची कल्पना आहे. त्यासाठीचा प्रस्ताव परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मांडून मान्यता घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना त्याच्या अर्जाची प्रगती तपासण्याची सुविधाही देण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे देण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे.

कागदपत्रांची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होण्यासाठी गेले दीड वर्ष पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरून त्याची मुद्रित प्रत घेऊन विद्यापीठात फेऱ्या मारण्याची गरज नाही. तसेच ऑनलाइन अर्जाच्या प्रगतीची माहिती लघुसंदेशाद्वारे मिळणार आहे.- राहुल पाखरे, अधिसभा सदस्य