पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल २२ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ५५ तोळे सोने, ४४० ग्रॅम चांदी, ८४ हजार रोकड, दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली. यात एका प्रेमी युगलाचा समावेश आहे. हर्षद पवार, विकास घोडके, आयाझ शेख, कुसुम धोत्रे, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वच जण सराईत गुन्हेगार आहेत. यातील विकास, हर्षद आणि आयाझ हे घरफोडी करायला जात असताना निगडी पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं. अटकेनंतर चौकशी केल्यावर विकास प्रेयसी कुसुम धोत्रे हिच्या मदतीने ठाण्यामधील सराफाकडे घरफोडीतील सोने विकत असल्याचं समोर आलं. चोरीच्या पैशातून त्यांनी फ्लॅट बुक केला आहे. तसेच एक स्विफ्ट कारदेखील खरेदी केल्याचे तपासात उघड झाले. या सर्व आरोपींवर १२ गुन्ह्यांची नोंद आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक औताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण,जमीर तांबोळी, फारूक मुल्ला, नितीन बहिरट, मंगेश गायकवाड, आनंद चव्हाण यांनी केली.