19 March 2019

News Flash

हिवाळा आणि ‘ड’ जीवनसत्त्व

मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते.

‘ड’ जीवनसत्त्व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह, रक्तदाब, हाडांचे आरोग्य, केसांचे आरोग्य, दातांचे आरोग्य इत्यादी अनेक बाबींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी हाडे, दात, केस यांचे आरोग्य धोक्यात येतेच; शिवाय मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते.

‘ड’ जीवनसत्त्व खाण्याच्या पदार्थामधून मिळतेच तसेच सूर्यप्रकाशापासून आपले शरीरसुद्धा ‘ड’ जीवनसत्त्व तयार करते. सूर्यप्रकाशातील यूव्हीबी किरण ‘ड’ जीवनसत्त्व तयार करण्यासाठी जास्त मदत करतात. हिवाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता कमी असते. यूव्हीबी किरण कमी प्रमाणात असतात. शिवाय थंडीमुळे आपण स्वेटर्स, जॅकेट, सॉक्स इत्यादींमध्ये स्वत:ला गुरफटून घेतल्याने त्वचेपर्यंत सूर्यकिरण जास्त प्रमाणात पोहचू शकत नाहीत. जे ‘ड’ जीवनसत्त्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. म्हणून ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ आहारात आवर्जून घेणे गरजेचे आहे. मासे, कॉड लिव्हर ऑइल, ताजे लोणी, चीज, मशरूम, अंडय़ातील पिवळा भाग, सोयाबीन, दूध, टोफू इत्यादी गोष्टींमधून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. पूर्ण शाकाहारी लोकांना खूप कमी पदार्थ खाता येतात. त्यासाठी संस्कारित पदार्थाचा अंतर्भाव जेवणात जरूर करावा. संस्कारित पदार्थ म्हणजे त्या पदार्थामध्ये ते जीवनसत्त्व नसले तरी बाहेरून ते जीवनसत्त्व त्या पदार्थामध्ये घातले जाते, यालाच ऋ१३्रऋ्री िऋ िअसे म्हणतात. असे अनेक पदार्थ बाजारामध्ये मिळतात. उदाहरणार्थ- संत्र्याचा रस, गव्हाचे पीठ, सोया, दूध, चीज इत्यादी. या पदार्थाच्या पॅकिंगवर असे लिहिलेले असते. यापैकी कोणताही एक किंवा जास्त पदार्थ आहारात ठेवावे म्हणजे हिवाळ्यात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भासणार नाही.

हा या सदरातला शेवटचा लेख. नवीन वर्षांत आपला आहार-विहार सुधारून आपले आरोग्य चांगले राहावे, हीच शुभेच्छा.

dr.sarikasatav@rediffmail.com

(सदर समाप्त)

First Published on December 31, 2016 1:09 am

Web Title: winter and vitamin d