‘ज्या कंपनीने त्यांना नोकरी नाकारली त्याच कंपनीने त्यांनी स्थापन केलेली कंपनी विकत घेतली,’ असा संदेश सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून सर्वत्र फिरतो आहे. ‘व्हॉटस्अ‍ॅप’चे संस्थापक जेन कोम आणि ब्रायन अ‍ॅक्टन यांच्याबाबतीत होता. तो संदेश खरा की खोटा हे दोघेच जाणोत, पण या दोघा मित्रांनी २००७ मध्ये याहू कंपनीमधील नोकरी सोडून दोन वर्षांनंतर म्हणजे २००९ मध्ये व्हॉट्सअ‍ॅपची स्थापना केली, तेव्हापासून आजच्या यशापर्यंत ते पोहोचले आहेत!  
एसएमएसला पर्याय म्हणून ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. इतकेच नव्हे तर लवकरच जगभरातील प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन येतील आणि ते या सेवेचा फायदा घेतील, अशी दूरदृष्टी ठेवून त्यांनी या कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या मार्केटिंगसाठी एक पसाही खर्च न करता अवघ्या चार वर्षांत व्हॉट्सअ‍ॅपचे ४५ कोटी वापरकत्रे होते.
व्हॉट्सअ‍ॅप ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये वाढलेली असली तरी या कंपनीचा जनक जेन हा मूळचा युक्रेनचा. जगभरच्या महत्त्वाकांक्षी ‘टेकी’ तरुणांप्रमाणेच तोही सिलिकॉन व्हॅलीकडे आकर्षति झाला. त्याच्याच देशातील मक्स लेवचीन यांनी पेपलची स्थापना केली होती, हाच आदर्श जेनने समोर ठेवला होता. बिल गेट्स, झुकेरबर्ग यांच्याप्रमाणे त्याचेही महाविद्यालीन शिक्षण अपूर्ण राहिले होते. त्याच्या आयटी क्षेत्रातील ज्ञानामुळे मात्र याहू कंपनीतील नोकरीमध्ये त्याने तग धरला. तेथे तो (संगणकाधारित) पायाभूत सोयीसुविधा आणि सुरक्षा अभियंता म्हणून दहा वष्रे कामाला होता. याचप्रमाणे त्याचा सहकारी आणि व्हॉट्सअ‍ॅपचा सहसंस्थापक ब्रायन हा मूळचा रशियाचा. त्याला शिक्षणाची प्रचंड आवड. संगणकविज्ञान या शाखेत पदवी मिळवल्यावर अर्थशास्त्र आणि संगणकीय विज्ञान या विषयात पदव्युत्तर अभ्यास ब्रायनने पूर्ण केला. ब्रायनच्या करिअरची सुरुवात रॉकवेल या कंपनीतून झाली. यानंतर त्याने अ‍ॅपल, अडोबे सिस्टीम्स अशा कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम केले. याहूमध्ये ब्रायन आणि जेनची ओळख झाली आणि काही तरी वेगळे सुरू करण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. पाच माजी सहकाऱ्यांकडून आर्थिक मदतीने- आणि या पाचांना ३५ टक्के समभाग देऊन कंपनी स्थापन झाली. उरलेल्यांत ब्रायनचा वाटा २० टक्के, ४५ टक्के जेनचा!  
जेन याला प्रसिद्धी आणि बडेजाव अजिबात आवडत नाही. फेसबुकसोबतच्या सहकार्यानंतर जेन आणि ब्रायन यांची जोडी फुटेल, असे नाही.. साधेपणा आणि आपले काम आत्मविश्वासाने करीत राहण्याची वृत्ती हा दोघांतला दुवा तर कायमच राहील.