रूप पाहतां लोचनी। सुख झाले वो साजणी।। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।। अभंगाच्या या ओळी अचलदादांनी पुन्हा एकवार उच्चारल्या. आशाबाईंच्या सत्त्वमधुर स्वरांत त्या अंतर्मनातही निनादल्या जणू.
योगेंद्र – पण दादा, खरंच हो हे ‘साजणी’ काय आहे?
अचलदादा – (हसतात) अहो, आधी पाहण्याचं वर्णन पूर्ण झालेलं नाही.. पण असो, आधी ‘साजणी’चं सांगतो. तुम्ही साजशृंगार हा शब्द ऐकलाय ना?
कर्मेद्र – हो. म्हणजे नट्टापट्टाच की.
अचलदादा – बरेचदा काय होतं, शब्द वापरून इतके सवयीचे होतात की त्यांचा खरा उगम किंवा त्यांचा खरा संकेत लोपूनच जातो. आता तुम्हाला ‘कुश’ माहीत आहे का? गवतात लपलेलं हे कुश गवतासारखंच दिसतं, पण अगदी धारदार असतं. गवत समजून ते तोडायला जाल तर बोट कापूही शकतं! हे कुश काढण्याची कला ज्याला साध्य आहे त्याला ‘कुशल’ म्हणतात. आज आपण अमका पाककलेत कुशल आहे, म्हणतो तेव्हा त्या कुशाची आठवण तरी होते का? वीणा वाजवण्याची कला ज्याला हस्तगत आहे, त्याला ‘प्रवीण’ म्हणतात. अमका पोहोण्यात प्रवीण आहे, असं आपण म्हणतो तेव्हा त्या वीणावादनाचा संदर्भही आमच्या मनाला शिवत नाही. दक्षिणेतल्या एका संस्थानचा कारभार पार ढासळला होता. महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ राहीला नव्हता. त्या संस्थानाचं नाव होतं ‘अनागोंदी’. आता तशा ढेपाळलेल्या कारभाराला आपण अनागोंदी कारभार म्हणतो! तशी काहीशी गत साजशृंगारची आहे. साज म्हणजे नटणं नाही, साज म्हणजे अवयव! अवयव नटवणं यावरून शब्द झाला सजणं.. इथे ‘सुख झाले वो साजणी’ म्हणजे शरीराचा रोम अन् रोम सुखानं भरून गेला, हा अर्थ तर आहेच, पण समस्त जगणं परम सुखानं व्यापून गेलं, हा अर्थ आहे.
हृदयेंद्र – व्वा! आंतरिक आणि बाह्य असं द्वंद्वच संपलं! भौतिकही सुखानं भरून गेलं!!
कर्मेद्र – म्हणजे भौतिकातल्या अडचणीही आपोआप संपल्या की काय?
अचलदादा – अडचणी संपल्या नाहीत, पण मनावरचा अडचणींचा प्रभाव उरला नाही. मनानं त्यांचं दडपण झुगारलं.. अडचणींमुळे घाबरणं, दु:खी होणं थांबलं. अहो गोंदवल्यात आहोत ना? म्हणून महाराजांचंच वाक्य आठवलं बघा. ते म्हणत, दु:खाची जाणीवच नसली तर मग दु:खं असलं म्हणून कुठे बिघडलं!
कर्मेद्र – अरे वा! समाजात इतकं दु:ख भरून आहे, त्याची जाणीव सोडून देऊन सगळीकडे आनंदीआनंद आहे, असं मानायचं की काय?
अचलदादा – सामाजिक दु:खाशी या वाक्याची सांगड घालू नका. आध्यात्मिक बोधाच्या केंद्रस्थानी व्यक्तीच असते. कारण व्यक्ती सुधारली तर समाज आपोआप सुधारत जातो आणि दु:खाच्या कोषात अडकलेल्या माणसाला समाजाच्या दु:खाची जाणीव तरी असते का? माणूस हा स्वत:च्याच दु:खांना प्राधान्य देतो. जगातली दु:खं उंबरठय़ापलीकडे असतात तोवर तुम्ही अस्वस्थ होत नाही. ती दु:ख तुमच्या घरातही शिरतील, त्यांच्या झळा तुम्हालाही लागतील, असं झालं की तुम्ही त्या दु:खांना प्राधान्य देता. त्याविरोधात आवाज उठवता. स्वत:कडे दु:खं घेऊन त्या मोबदल्यात जगाला सुखी करण्यास तुम्ही तयार असता का? स्वत: जन्मभर दु:खं भोगायची पूर्ण तयारी ठेवून जग आनंदानं भरून टाकायचं कार्य फार मोजक्या लोकांनीच केलं. संत त्यात अग्रणी होते. माणसाला व्यापक करण्याचं त्यांचं कार्य युगानुयगं चालूच आहे. सामाजिक सुखाला चालना देणारं याइतकं दुसरं मोठं कार्य नाही..
हृदयेंद्र –  कर्मू तुला विषयाला फाटे फोडायची सवयच झाली आहे..
अचलदादा – अहो, पण या प्रश्नात गैर काय आहे? पण कर्मेद्रजी समाजाचं दु;खं दूर करणं हे विराट कार्य आहे आणि हे तोच करू शकतो ज्यानं वैयक्तिक सुख-दु:खाला तिलांजली दिली आहे. अध्यात्म हीच व्यापकता तर शिकवतं. तेव्हा श्रीमहाराज दु:खाची जाणीव विसरायला सांगत नाहीत, त्या जाणिवेचं संकुचित केंद्र बदलायला सांगतात. तेव्हा जो व्यापक आहे, त्याच्या खऱ्याखुऱ्या दर्शनानं पाहाणाराही व्यापक झाला आणि त्यामुळेच ‘सुख झाले वो साजणी’ म्हणजे या देहातलाच नव्हे तर जगण्यातला रोम अन् रोम सुखानं भरून गेला!
चैतन्य प्रेम    

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
posthumous organ donation of two women gave life to four people
शेतात राबणाऱ्या ‘त्या’ दोघींच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo