सद्गुरू-प्रेमाचं महत्त्व जाणून त्यांच्या बोधानुरूप आचरण केलं तरच भवासक्त जीवनाची रीत बदलू लागते. त्या आचरणात गोडी निर्माण झाली की मग जीवनाची पूर्वीसारखी रीतही उरत नाही, या मुद्दय़ाशी चर्चा येऊन थांबली. मग परत चहा आला आणि ज्ञानेंद्र कुठलासा ग्रंथ कपाटातून काढून चाळत होता.. त्या ग्रंथाकडे नजर टाकत योगेंद्र म्हणाला..
योगेंद्र : निसर्गदत्त महाराजांचं पुस्तक आहे..
ज्ञानेंद्र : हं.. यातला हा भाग आपल्या चर्चेसाठी महत्त्वाचा आहे पाहा.. हा कुणी एक त्यांच्या भेटीला आलेला तरुण स्वीडनमध्ये जन्मला आहे. मेक्सिकोत आणि अमेरिकेत तो हठयोग शिकवत आहे. हा हठयोग त्याला एका भारतीय साधूनं शिकवला आहे. तो योगाकडे का वळला.. त्याला काय मिळवायचं आहे इथवर श्री महाराजांनी त्याला बोलतं केलं. अखेर तो म्हणाला, मला काही प्रमाणात मन:शांती मिळाली, पण मन पूर्ण शांत झालेलं नाही. शांतीचा शोध संपलेला नाही. त्यावर श्री महाराज काय म्हणाले? थांबा हं.. वाचूनच दाखवतो.. महाराज म्हणतात, ‘‘साहजिक आहे. तुमचा मन:शांतीचा शोध संपणार नाही, कारण मन:शांती अशी काहीच गोष्ट नाही!’’
योगेंद्र : अरे!
ज्ञानेंद्र : पुढे ऐक.. तर म्हणाले, ‘‘मन:शांती अशी काहीच गोष्ट नाही. मन म्हणजे खळबळ, खळबळ म्हणजे मन.’’
हृदयेंद्र : अशांत, अस्वस्थ होताच जे मन जाणवतं ते शांत होणंही कठीण असंच महाराजांना सांगायचं असावं..
कर्मेद्र : वा.. वा..पण या एका वाक्यानं मन:शांतीची हमी देणारी सगळी दुकानदारीच मोडीत निघेल!
योगेंद्र : पण असं असलं तरी मन:शांतीचा माणसाचा प्रयत्न संपत्ती कुठे? कधी तरी अशी स्थिती येईलच जेव्हा सर्व अंतर्विरोधावर मन मात करील आणि मन शांत होईल..
ज्ञानेंद्र : श्रीनिसर्गदत्त महाराज त्याबाबत पुढे काय म्हणतात पाहा.. ते म्हणतात, ‘‘शांती मिळाली असं तुम्ही म्हणता, पण ती फार ठिसूळ आहे. कोणत्याही अल्प कारणाने ती बिघडू शकेल. तुम्ही म्हणता ती शांती म्हणजे फक्त अस्वस्थतेचा अभाव आहे. शांती हे नाव तिला शोभत नाही. खरी शांती कधी ढळत नाही..’’ मग महाराज पुढे सांगतात.. ‘‘फक्त मनच अस्वस्थ असते. अनेक प्रकारची आणि अनेक श्रेणीची अस्वस्थताच मनाला माहीत असते. त्यापैकी सुखकारक प्रकार श्रेष्ठ समजले जातात आणि वेदनादायक असतात ते कमी केले जातात. आपण म्हणतो ती प्रगती म्हणजे अप्रिय गोष्टींकडून सुखकारक गोष्टींकडे होणारा बदल..’’
हृदयेंद्र : हो अगदी खरं आहे! आध्यात्मिक प्रगतीचा मापदंडही गोष्टी मनाप्रमाणे घडत गेल्या का, हाच तर कित्येकदा लावला जातो! हाही भ्रमच आहे..
ज्ञानेंद्र : श्रीनिसर्गदत्त महाराजांच्या सांगण्यानुसार खरी शांती ही तुमच्यात आहेच. ती निश्चल शांतीची स्थिती प्रत्येकानं अनुभवली पाहिजे. या अनुभवाच्या आड जे अडथळे येतात ते महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘सुखाची इच्छा आणि दु:खाची भीती. सुखदु:खविषयक हेतूच आड येतात. सर्व हेतूंपासून स्वतंत्रता, ज्या स्थितीत कोणतीही इच्छा निर्माण होत नाही, तीच सहज स्थिती..’’
योगेंद्र : पण अशी इच्छांपासून, हेतूंपासून मुक्तता व्हायला किती काळ लागेल?
ज्ञानेंद्र : (हसत) हाच प्रश्न त्या तरुणानंही केला! त्यानं विचारलं, ‘‘असा इच्छांचा त्याग करण्यास कालावधी लागतो काय?’’ श्रीनिसर्गदत्त महाराज त्यावर उद्गारले, ‘‘तुम्ही ते काळावर सोपवलेत तर लक्षावधी वर्षे लागतील. इच्छेपासून इच्छेचा त्याग करणेही दीर्घ प्रक्रिया आहे. तिचा शेवट कधीच दिसत नाही. ’’
हृदयेंद्र : (गंभीरपणे) हे सगळं ऐकताना मला जाणवत होतं की श्री सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्यात हेच तर अडथळे येतात! श्रीसद्गुरू मला परमानंद देऊ इच्छितात.. नव्हे ती माझी मूळ स्थिती मला पुन्हा जाणवावी, हे इच्छितात.. म्हणून त्यांची प्रत्येक आज्ञा, प्रत्येक बोध मला भवदु:खापासून दूर करणारा असतो. ज्या-ज्या गोष्टी वरकरणी मला सुखदायक भासतात त्या अखेरीस कशा दु:खदायकच असतात, हे त्यांनाच माहीत असतं.. त्या दु:खाच्या जाळ्यात मी अडकू नये, म्हणूनच तर ते आज्ञा देतात.. माझ्या मनात देहबुद्धीला चिकटलेले, देहबुद्धी जपू पाहाणारे, ती जोपासू पाहणारेच अनंत हेतू चिकटले असतात.. त्या हेतूंपासून मन जोवर दुरावत नाही तोवर सद्गुरूंचा बोध खऱ्या अर्थानं ग्रहण केला जात नाही, त्या बोधाचं खरं ग्रहण होत नाही म्हणून खरं आचरण साधत नाही..