चोखामेळा महाराज यांचा ज्ञानेंद्रनं सांगितलेला अभंग प्रथमदर्शनी बुद्धीला आव्हान देणाराच होता आणि तेवढय़ात दाराची कडी वाजली.. चर्चेत भंग करायला कोण आलं, या विचारानं हृदयेंद्रनं काहीशा त्रासिक भावनेनं दार उघडलं आणि तो चकीतच झाला. दारात अचलानंददादा आणि विठोबादादा होते. ज्ञानेंद्रलाही विठोबादादा अर्थात बुवांना पाहून आश्चर्य वाटलंच..

हृदयेंद्र – वा वा वा.. माझ्यावर गुरुजींची कृपाच आहे म्हणायची.. पण असे अचानक कसे आलात?
बुवा – चातुर्मासासाठी जवळच्या उपनगरांत अचानक कार्यक्रम ठरला आणि आलो. जन्माष्टमीचं कीर्तन झालं. आता दोन दिवस उसंत मिळाली म्हणून म्हटलं यावं आणि झालीच भेट तुम्हा सर्वाना भेटावं. तर कीर्तन संपलं तेव्हा पाया पडणाऱ्यांत अवचित तुमचे अचलानंद दादा भेटले.. आधी आम्ही ज्ञानाकडे गेलो होतो, तिथे कळलं दहीहंडीचा दिवस सत्कारणी लावण्यासाठी तुम्ही इथे जमले आहात. अचलानंद दादांना तुमचं घर माहीत होतं म्हणून येणं सोपं झालं! (गुरुजींच्या तसबिरीला व पादुकांना नमस्कार केल्यावर खोलीकडे नजर टाकत) वा उपासनेसाठी अगदी योग्य एकांतस्थान आहे!
हृदयेंद्र – बरं चहा घेणार की दूध?
बुवा – सगळं प्रज्ञाकडे झालंय.. इथं आलोय ते कान आणि अंत:करण तृप्त करायला!!
हृदयेंद्र – माझ्या आनंदाची कल्पनाच तुम्हाला करता येणार नाही.. बुवा, दादा.. एक भन्नाट अभंग आहे..
अचलदादा – अरे वा.. चिकाटीनं तुमचा अभंगसत्संग सुरूच दिसतोय.. सध्या कोणत्या संताचं बोट पकडलंय? (अभंगांना ‘संताचं बोट’ म्हणण्याची अचलानंद दादांची कल्पना हृदयेंद्रला मनापासून आवडली. त्यानं गेल्या काही दिवसांतल्या चर्चेची थोडक्यात माहिती दिली आणि मग तो म्हणाला..)
हृदयेंद्र – ज्ञान्यानं चोखामेळा महाराजांचा एक भन्नाट अभंग शोधलाय.. ऐका हं..
डोळियाचा देखणा पाहतां दिठी। डोळाच निघाला देखण्या पोटी।। डोळ्याचा देखणा पाहिला डोळा। आपोआप तेथें झांकला डोळा।। चोखा म्हणे नवलाव झाला। देखणा पाहतां डोळा विराला।।
बुवा डोळे मिटून अभंग ऐकण्यात तल्लीन झाले होते. अचलानंद दादा जमिनीकडे एकटक पाहत एकाग्रचित्तानं अभंग ऐकत होते.. अभंग वाचून झाला. काही क्षण कुणीच काही बोललं नाही.. अर्थात जे बोलायचं ते आता बुवा आणि दादाच बोलतील, या भावनेनं हृदयेंद्र त्यांच्याकडे पाहात होता.. धीरगंभीर शब्दांत बुवा बोलू लागले..
बुवा – काय उच्च अवस्था आहे पहा! तीन चरणांच्या या अभंगात डोळा हा शब्द सहावेळा आलाय आणि प्रत्येक वेळी त्याचा अर्थसंकेत, त्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे.. (बुवांच्या या उद्गारावर हृदयेंद्रचं कुतूहल वाढतं, ज्ञानेंद्र, योगेंद्रही सरसावून ऐकू लागतात. अचलानंद दादांच्या चेहऱ्यावर स्मित आहे.. जणू एकाच पातळीवर बुवा आणि दादांचा विचार जुळला आहे..)
अचलदादा – अभंगातले सर्वच शब्द परिचयाचे आहेत, या जाणिवेनं अभंग वाचायला सुरुवात होते आणि मग दृष्टीभ्रमात आपण अडकतो! पुन्हा पुन्हा वाचूनही अर्थ मग लागेनासा होतो..
हृदयेंद्र – (हसत) उलट पुन्हा पुन्हा वाचताना आधी कळल्यासारखा वाटलेला अर्थही विसरायला होतो!
बुवा – बरं, एवढा काही कठीण नाही बरं का हा अभंग.. नीट वाचा, एकेका शब्दाची ओळख करून घ्या.. मग कळेल.. इथे पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांपैकी ‘डोळा’ या एका इंद्रियाचा दाखला घेतला आहे.. हा डोळा कोणता? त्याचं खरं प्रयोजन काय? ते साधलं तर काय घडतं? या सगळ्यावर या अभंगात प्रकाश टाकला आहे.. माउली काय म्हणतात? ‘जे दीठी ही न पविजे। तें दिठीविण देखिजे।’ जे दृष्टीलाही दिसू शकत नाही ना, ते दृष्टीशिवाय, डोळ्यांशिवाय पाहता येतं! बघा हं.. पाहायचं असेल तर डोळ्याशिवाय शक्य नाही, ही आपली धारणा आहे. माउली काय म्हणतात? जे डोळ्यांनाही दिसू शकत नाही, ते डोळ्यांशिवाय पाहता येतं! कसं हो? (अचलानंद दादांकडे प्रेमकौतुकानं पाहात) सांगा हो पूर्ण ओवी..
अचलदादा – जे दीठी ही न पविजे। तें दिठीविण देखिजे। जऱ्है अतींद्रिय लाहिजे। ज्ञानबळें!!