scorecardresearch

Premium

चला, खेळातून शिकू या बरेच काही

चतुरंग, ज्ञान चौपड, अष्टापद, पचीसी, गंजिफा पत्ते यांसारख्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला.

खेळ
खेळ

मुले खेळातून गणित, भाषा, भूगोल, सामान्यविज्ञान, इतिहासासारखे शालेय विषय तर शिकू शकतातच, त्याबरोबरच त्यांना अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू  शकतो. त्यामुळे  खेळ अभिकल्पित करताना मनोरंजन आणि अभ्यासक्रमातील आशय, यांचा सुसंवाद साधणे महत्त्वाचे.

आधीच्या लेखात आपण खेळ कसे अभिकल्पित (डिझाइन) करतात, खेळनाटय़ाचे (गेम-प्लेचे) महत्त्व व त्याचे घटक कोणते हे पाहिले. खेळताना मुलांना गंमत येते हे खरे, पण उत्तम खेळ त्यांच्या मनावर पकड घेऊ शकतात आणि ते खेळता खेळता बरेच काही शिकवूनही जातात. या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपण खेळातून अधिक काही साध्य करू शकतो का? हेतुपूर्ण खेळांच्या अभिकल्पेनेचे मूळ यातच आहे.

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

हेतुपूर्ण खेळ ही कल्पना नवीन नाही. भारतात पटावरील खेळांची समृद्ध परंपरा आहे. चतुरंग, ज्ञान चौपड, अष्टापद, पचीसी, गंजिफा पत्ते यांसारख्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला. हे खेळ अनेक धर्मानी स्वीकारले व आपआपल्या देव-देवता व नीतितत्त्वांप्रमाणे त्यांच्यात बदल घडविले. साप-शिडी हा खेळ प्राचीन भारतात अभिकल्पित झाला. त्या काळात याला मोक्षपट्टम, ज्ञान चौपड, वैकुंठपल्ली इत्यादी नावांनी ओळखले जात होते. मुळात हा खेळ शैक्षणिक (हेतुपूर्ण) होता. या खेळात कर्म व काम या नतिक संकल्पना समजावल्या जात होत्या. सुरुवातीला खेळाडू सगळ्यात खालच्या, अर्थात नरकाच्या पातळीवरून सुरू करत, आपल्या भाग्यानुसार  (फाशांच्या आकडय़ाप्रमाणे) पुढे चालत. जेव्हा खेळाडू पुण्याच्या चौकटीवर पोहोचायचे, तेव्हा त्या चौकटीवर त्या पुण्यकर्माची माहिती असायची व त्या चौकटीवर दोरी असायची – ज्याच्या साहाय्याने खेळाडू वरच्या पातळीवर जाऊ शकत. तसेच जेव्हा खेळाडू पापाच्या चौकटीवर पोहोचायचे, तेव्हा तिथे साप असल्यामुळे ते खालच्या पातळीवर येत. खेळातील शेवटची चौकटी मोक्षाची असे, जिथे पोहोचल्यावर तो खेळाडू खेळ जिंकत असे. मूळ खेळामध्ये श्रद्धा, दान, तपश्चर्या इत्यादी पुण्यकर्माचे व चोरी, खून, राग, कर्ज, लोभ, अहंकार, वासना इत्यादी पाप कर्माचे महत्त्व समजाविले जात असे.

तसे पाहिले तर सगळ्या खेळांतून काही ना काही शिकता येतेच. खेळताना मुले कर्णधाराची निवड करणे, त्याचे हुकूम पाळणे, आळीपाळीने खेळणे, संघवर्तन वगरे शिकतातच. पण मुले गणित, भूगोल, इतिहास यांसारखे विषय शिकू शकतात का? एखादे दैनंदिन काम शिकू शकतात का? उदाहरणार्थ बॅँकेचे व्यवहार करणे. नवीन व्यवसाय, उदाहरणार्थ शेती कशी करायची हे शिकू शकतात का? या लेखात आम्ही अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शाळेतले धडे व खेळ

बऱ्याच मुलांना अंकगणित कठीण जाते. आमच्या काही विद्यार्थ्यांनी, तोंडी हिशेब शिकवण्यासाठी ‘माथा चिब्बी’ नावाचा मदानी खेळ अभिकल्पित केला आहे. तो पारंपरिक ठिकरीच्या संकल्पनेवर आधारित आहे. आठ-दहा खेळाडू एकत्र आले की एक ठिकरी किंवा दगडाचा चपटा तुकडा शोधायचा आणि ओसरीवर किंवा मदानात खडूने पट आखायचा. त्यावर शून्य ते नऊ आकडे लिहायचे. चार कोपऱ्यात चार गणिती चिन्हे (+, -, ७, ) काढली की झाला खेळपट तयार. जागेआभावी माथा चिब्बी कसा खेळायचा हे इथे विस्ताराने सांगणे कठीण आहे पण तो तुम्ही यू-टय़ुबवर पाहू शकता. (http://goo.gl/Hh3A4Q).

खरेच अशा खेळांमुळे लाभ होतो का? एक उदाहरण तुम्हाला हे नक्कीच पटवून देईल. अपूर्णाकाची कल्पना तशी शिकण्यास कठीण आहे. म्हणूनच या संकल्पनेवर आमचे काही विद्यार्थी ‘अपूर्णाकाचे साम्राज्य’ नावाचा खेळ अभिकल्पित करीत होते. त्यासाठी त्यांनी काही शाळकरी मुलांना खेळचाचणीसाठी (प्ले-टेिस्टग) निमंत्रण दिले होते. सातवीतील काही मुले खेळ खेळण्यात रमली होती. त्यांना बघून त्यांच्यापेक्षा एक-दोन वर्षांनी लहान असलेली मुलगी, बघत बघतच तो खेळ शिकली. पुढचा डाव तिने स्वत खेळला आणि मोठय़ा मुलांना हरविले. खेळामुळे तिला अपूर्णाकाची तोंडओळख तर झालीच, एवढेच नाही तर त्यांचा अर्थही कळला आणि उपयोग कसा करतात हेसुद्धा कळले.

शालेय पुस्तकांतील धडे व त्यांतील अनेक संकल्पना घेऊन त्यावर खेळांची रचना करणे शक्य आहे. मुलांना संकल्पना कळण्यास व त्या अंगवळणी पडण्यास खेळाचा उपयोग होऊ शकतो. असे खेळ अभिकल्पित करताना अभिकल्पक फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित न करता, हे खेळ खेळताना खूप करमणूक करत, मुलांना हसवत, नकळतपणे एखादी संकल्पना मनावर कशी बिंबवता येईल याचा विचार करतात. स्क्रॅबल हा इंग्रजी खेळ याचे एक उत्तम उदाहरण आहे. मुले तो खेळताना रंगतात आणि कळत-नकळत इंग्रजी स्पेिलग शिकतात. जसा स्क्रॅबल इंग्रजी शिकवतो, तसाच अक्षरीत नावाचा खेळ अनेक भारतीय भाषांतील शब्द शिकवतो.

मुले खेळातून गणित, भाषा, भूगोल, सामान्यविज्ञान, इतिहासासारखे शालेय विषय तर शिकू शकतातच, त्याबरोबरच त्यांना अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू  शकतो. नवीन रोचक कथा बनवणे, सर्जनशीलता वाढवणे, धोरण आणि नियोजन शिकणे यांसारखी विविध बौद्धिक कौशल्ये वाढवण्यासाठी आयडीसीतील विद्यार्थ्यांनी खेळ अभिकल्पित केले आहेत.

मुलांनाच स्वत खेळ अभिकल्पित करता आले तर सोन्याहून पिवळे. काही वर्षांपूर्वी आठवी-नववीतील शालेय मुलांसाठी आम्ही एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात मुलांनीच स्वत अनेक शैक्षणिक खेळ अभिकल्पित केले. ते खरोखरच प्रशंसनीय होते. शालेय शिक्षक असे खेळ अभिकल्पित करू शकतील का? खेळाची आवड असलेले शिक्षक, आपल्या वर्गातील मुलांना सहभागी करून असे नवीन शैक्षणिक खेळ नक्कीच अभिकल्पित करू शकतील. समजा उत्तम शैक्षणिक खेळासाठी स्पर्धा ठेवल्या व त्यांना आपले खेळ दाखवण्याची संधी दिली तर अशा शालेय प्रकल्पांना नक्कीच अधिक चालना मिळेल आणि हसत खेळत शिक्षणही पक्के होईल.

खेळ अभिकल्पनेतील आव्हाने आणि संधी

खेळ अभिकल्पित करताना मनोरंजन आणि अभ्यासक्रमातील आशय, यांचा सुसंवाद साधणे महत्त्वाचे. याशिवाय इतर बाबींवरही लक्ष ठेवणे गरजेचे असते. खेळ आकर्षक बनवणे हे तर अभिकल्पकाचेच काम. आकर्षक खेळपट, त्यावरचे खेळविश्व, सोंगटय़ा, प्यादी, नोटा, इतर गोष्टी आणि हे सगळं ठेवायला एक खोके. या खोक्याला आणि त्याच्यावरील चित्रांना विक्रीच्या दृष्टीने खूप महत्त्व असते. दुकानातील फळ्यांवर आणि मॉलमधील खिडक्यांमध्ये आपला खेळ इतर खेळांच्या तुलनेत उठून दिसला पाहिजे, ज्यायोगे  ग्राहक त्याच्याकडे आकर्षति होतील.

हे सर्व करताना खेळांची किंमत आवाक्याबाहेर जाता कामा नये याचे भानदेखील अभिकल्पकालाच राखावे लागते. हल्ली भारतीय बाजारात मिळणाऱ्या खेळांचे, किमतींच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे तीन गट करता येतील. १००-१५०, ४००-५०० व १००० व त्यापेक्षा जास्त. त्यापकी स्वस्त खेळांचाच खप जास्त असतो. हे खेळ भेटवस्तू म्हणून सर्रास वापरले जातात. या खेळांचे बाजारमूल्य जरी १०० ते १५० असले तरी उत्पादन खर्च फक्त ३५-४० असतो. एवढय़ा कमी किमतीत चांगले आकर्षक खेळविश्व तयार करण्याचे फार मोठे आव्हान अभिकल्पकापुढे असते.

आजच्या स्पर्धात्मक व्यापारी जगतात आणि चीनने मारलेल्या भारतीय बाजारपेठेतील मुसंडीने, भारतीय खेळणी आणि खेळ उत्पादकांना जणू गाशा गुंडाळायची वेळ आली आहे. ‘टिकाऊ’ नसली तरी चिनी खेळ आणि खेळणी बहुतांशी ‘सुंदर आणि स्वस्त’ असतात. त्यामुळे बाजारात त्यांचा खप जास्त होतो. नुकत्याच सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेमध्ये भारतीय उत्पादकांनी अभिकल्पाचा वापर करून, जुन्या पारंपरिक खेळांना पुनरुज्जीवन देऊन, हसत-खेळत शिक्षण देणाऱ्या नवीन खेळांची निर्मिती करणे चपखल बसू शकेल. अशा प्रकारे शैक्षणिक आणि आíथक उद्दिष्टे साध्य करण्यात खेळ अभिकल्पाचा सिंहाचा वाटा असू शकेल.

खेळांची इतर उदाहरणे व माहितीसाठी बघा.

१. मदानी खेळ माथा चिब्बी: https://goo.gl/Hh3A4Q इतर मदानी खेळ: https://goo.gl/0dqcHo

२.आतापर्यंत केलेल्या खेळाबद्दल अधिक माहिती  http://www.idc.iitb.ac.in/projects/idc_games/

सर्व लेखक  आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ई-मेल  :uday.athavankar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अभिकल्प बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2016 at 05:33 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×