scorecardresearch

Premium

‘नंतर आलेल्यां’चा गौरव!

‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ आदी, कृष्णवर्णीयांवरील अत्याचारविरोधी  मोहिमांचा पगडा गेल्या दोनतीन ऑस्करवर दिसतो.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

हॉलिवुडमधील गौरवर्णीयांचा सोहळा’ हे ऑस्कर पुरस्कारांचे जुने स्वरूप आता किती बदलते आहे, प्रभाव-परीघ कसा विस्तारतो आहे, हे यंदा अधिक समर्थपणे दिसले…

लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे बहुतांश विजेत्या चित्रपटांच्या कथानकास एक नकारात्मकतेची, वेदनेची किनार आढळून आली… आणि पुस्तके, नाटक यांच्या अभिजाततेचीही!

बहुतांश जग करोनाकालीन ‘मुस्कटदाबी’ सहन करीत असताना खऱ्याखुऱ्या आणि मुखपट्टीविरहित माणसांचा रसरशीत ‘ऑस्कर’ सोहळा या वेळी परग्रहावरील अनुभव भासत होता. प्रचलित वातावरणात त्याच्या भव्यतेचा आकार कमी झाला होता हे खरे. पण तसे होताना त्यातील जिवंतानुभवास कात्री लागणार नाही, याची खबरदारी आयोजकांनी घेतली होती. दिमाखदार, रंगतदार अशा विशेषणांनी गेली कित्येक दशके वर्णिल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्यास यंदा विषाणूकहरामुळे दिरंगाईचा सामना करावा लागला. एरवी फेब्रुवारी अखेर ते मार्च आरंभीच ‘ऑस्कर’ आटोपलेला असतो आणि पुढील काही माहिन्यांत कोणकोणते चित्रपट, वृत्तपट पाहायचे याची यादी जगभरच्या रसिकांत फिरू लागलेली असते. यंदा तसे झाले नाही. ‘होणार’ की ‘नाही होणार’ या हिंदोळ्यात या सोहळ्याला एप्रिल अखेर उजाडावा लागला. सरते वर्ष जग आणि अमेरिका यांच्यासाठी अनेकार्थांनी महत्त्वाचे होते. निवडणुका, कॅपिटॉलवरील हल्ला आणि जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीयाची निर्घृण हत्या यांनी अमेरिकी समाजजीवन यंदा व्यापले. त्याचे प्रतिबिंब या सोहळ्यावर पडून कृष्णवर्णीय कलाकारांना झुकते माप दिले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो खोटा ठरला. अश्वेतवर्णीयांचे या पुरस्कार मानकऱ्यांत आधिक्य होते; पण ते ऑस्करचा प्रभाव-परीघ विस्तारत असल्याचे निदर्शक ठरते.

यातही विशेष लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे बहुतांश विजेत्या चित्रपटांच्या कथानकास एक नकारात्मकतेची, वेदनेची किनार आढळून आली. आतापर्यंत दुसरे महायुद्ध, ज्यूंवर होणारे अत्याचार आदी मुद्द्यांभोवती घोटाळणारी ही वेदनेची किनार आता अन्यांच्या जगण्यातील नकारात्मकतेलाही चित्रकवेत घेताना दिसते. ही जागतिक चित्रपटाच्या सर्वात्मकतेची खूण. यंदा ती अधिक ठसठशीतपणे दिसून आली. ही बाब महत्त्वाची अशासाठी की अलीकडे आपल्याकडे सकारात्मकतेचे खूळ बळावू लागले आहे. अमेरिकी कलाविश्व अशा काही वेडपटपणांपासून मुक्त असते ही बाब सुखावणारी. असो. आता यंदाच्या पुरस्कारांविषयी.

अमेरिकी पत्रकार जेसिका ब्रुडर यांच्या ‘नोमॅडलॅण्ड : सर्व्हायव्हिंग अमेरिका इन द ट्वेंटीफस्र्ट सेंच्युरी’ या पुस्तकात अमेरिकेतील मंदीमुळे नोकरी- घर हिरावून गेलेल्या एका मोठ्या समूहाच्या विस्थापनाची कहाणी आहे. मूळच्या या ललितेतर पुस्तकाला दिग्दर्शिका क्लोई जाओ आणि अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांनी चित्रकथेचे रूपडे दिले. हा चित्रपट यंदा सर्वोत्कृष्ट ठरला. अचानक आलेले वैधव्य आणि निसटत्या रोजगारसंधीस सामोरे जाताना जगण्यासाठी फिरस्ती करणाऱ्या कणखर महिलेची ही गोष्ट ऑस्करविजेती ठरली. क्लोई जाओ या ३९ वर्षीय अमेरिकी-कोरियाई दिग्दर्शिकेच्या नावावर आधी जगाच्याच काय पण अमेरिकेच्याही खिजगणतीत नसलेले दोन चित्रपट आहेत. पण ‘नोमॅडलॅण्ड’ने तिची ऑस्करच्या इतिहासात नोंद करून घेतली. ऑस्कर मिळविणारी पहिली अ-श्वेत महिला दिग्दर्शिका आणि दुसरी महिला चित्रकर्ती (दहशतवादावरच्या ‘हर्ट लॉकर’साठी कॅथरिन बिगलोनंतर) म्हणून तिची ओळख आता कायम राहील. अत्यंत संयतरीत्या चालणारा हा चित्रपट अमेरिकेच्या निसर्गातील रंगांचा गडद वापर करीत नायिकेच्या शोकांतकथेचा विस्तार करतो. मंदीने, बेरोजगारीने, घरभाडे थकल्याने नागरिकांच्या होणाऱ्या फरपटीची ही कहाणी मानवी अध:पतनाच्या भविष्यकाळाची नांदी आहे. संपूर्ण जगाला अर्थइशारा देणाऱ्या या चित्रपटाची बहुतांश अन्य सर्वच मानाच्या पुरस्कारांवर वर्णी लागली होती. ऑस्करनेही चित्रपटाच्या या गंभीर आशयाला अनुमोदन दिले.

डेव्हिड फिंचर या गुणी चित्रकत्र्याची निराशा यंदाही पाहायला मिळाली. त्याच्या ‘द क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’ या चित्रपटाला २००८ मध्ये सर्वाधिक १३ नामांकनांतून केवळ तांत्रिक विभागातील तीन पुरस्कार मिळाले. ‘सोशल नेटवर्क’ला २०१०मध्ये आठ नामांकनांपैकी केवळ तीन पुरस्कार मिळाले. २०१५ साली ‘गॉन गर्ल’ची हवा ‘बर्डमॅन’ या चित्रपटाने काढून टाकली. यंदा हर्मन जे मंकीविच या दिवंगत पटकथाकाराच्या ‘मँक’ या चरित्रग्रंथावर त्याच नावाचा चरित्रपट घेऊन आलेल्या फिंचरच्या ‘मँक’ला सर्वाधिक १० नामांकने होती. ‘सिटिझन केन’ या अभिजात चित्रपटाची पटकथा लिहिणाऱ्या मँकचे चमत्कृतीपूर्ण आयुष्य आणि १९४०च्या दशकातील अमेरिकी चित्रउद्योगाची जडणघडण रंगविणाऱ्या या सिनेमाला अखेर तांत्रिक गटातील दोन पुरस्कारांवर समाधान मानावे लागले. ‘फाईट क्लब’ (१९९९) या त्याच्या ‘कल्ट हिट’ ठरलेल्या चित्रपटानंतर तब्बल सात सिनेमे ऑस्करमध्ये गाजवूनही दिग्दर्शक म्हणून ऑस्करची पसंती त्यास अद्याप लाभलेली नाही. यंदाही तेच झाले.

‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ आदी, कृष्णवर्णीयांवरील अत्याचारविरोधी  मोहिमांचा पगडा गेल्या दोनतीन ऑस्करवर दिसतो. गोरे नसलेले तब्बल नऊ चेहरे यंदाच्या महत्त्वाच्या २० पुरस्कारांसाठी स्पर्र्धेत होते. ‘मा रेनीज् ब्लॅक बॉटम’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकित असलेला चित्रपट १९२० च्या दशकात लोकप्रिय असणाऱ्या काळ्या गायिकेच्या गाण्याची ध्वनिफीत मुद्रित करण्याच्या दिवसाची गोष्ट सांगतो. गोऱ्यांनी जगभर प्रसविलेले लोकप्रिय संगीत हे काळ्यांकडून चोरले याचा बराचसा इतिहास ज्ञात आहे. चित्रपटात मा रेनी या गायिकेच्या नखऱ्यांची आणि तिच्या गाण्यातील सहवादकाच्या बंडखोरीची गोष्ट येते. त्याचबरोबर गोऱ्यांच्या संगीत चलाखीच्या प्रकरणाचीही नोंद घेतली जाते. या चित्रपटातील चॅडविक बोसमन या कृष्णवर्णीय कलाकाराला मरणोत्तर ऑस्कर पुरस्कार हमखास मिळेल, असा साऱ्या चित्रप्रेमींचा कयास यंदा अकादमीने खोटा ठरविला. बाफ्टापासून सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांत बोसमनचे वर्चस्व होते.

‘साउण्ड ऑफ मेटल’ या इंडिपेण्डण्ट सिनेमाला सहा नामांकने मिळणे, हा या उत्तम चित्रपटाचा सन्मानच होता. रिझ अहमद याला पुरस्कार मिळाला असता, तर तो मिळविणारा पहिला मुस्लीम कलाकार म्हणून त्याची नोंद झाली असती. एका तालवादकाची बहिरेपणाकडे होत चाललेली वाटचाल हा चित्रपटाचा विषय. त्याच्या कानांच्या क्षमतेची जाणीव चित्रपट पाहताना सतत करून देणारे अचाट असे संकलन त्याला या गटाचे ऑस्कर देऊन गेले. फ्लोरिअन झेलर या फ्रेंच नाटककाराची ‘द फादर’ ही जगप्रसिद्ध कलाकृती. स्मृतिभ्रंशाच्या फेऱ्यात अडकलेला वृद्ध पिता आणि त्याच्या मुलीच्या कहाणीचे देशोदेशीच्या रंगभूमीवर सादरीकरण झाले आहे (भारतात या ‘पित्या’ची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी साकारली होती.) आपल्या नाट्यसंहितेला पटकथेत फिरवून झेलर यांनी स्वत:च चित्रपट तयार केला. ८४ वर्षीय सर अ‍ॅन्थनी हॉपकिन्स यांना या ‘द फादर’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी ऑस्कर मिळाल्याने, सर्वाधिक वयाच्या व्यक्तीला सर्वोत्तम अभिनेत्याचा किताब मिळण्याचा इतिहास यंदा घडला.

आशियाई देशातील निर्वासितांना १९८०च्या दशकात अमेरिकेतील गावांत आश्रय देण्याचे अनेक कार्यक्रम राबविले गेले. ‘मिनारी’ चित्रपटात अशा, नव्या देशातील संस्कृती आणि व्यवहार आत्मसात करू पाहणाऱ्या दक्षिण कोरियाई कुटुंबाची गोष्ट येते. आत्यंतिक मेलोड्रामा असलेल्या या चित्रपटाचे स्पर्धेतील अस्तित्व हे ‘पॅरासाइट’ या गतवर्षीच्या विजेत्या चित्रपटाने आखून दिलेल्या यशमार्गामुळे पक्के झाले होते. तर सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका, सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पटकथेसाठीही नामांकने मिळवणाऱ्या ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’ या कॅरी मलिगन अभिनीत ब्रिटिश सूडपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एमराल्ड फेनेल या दिग्दर्शिकेला पहिल्याच प्रयत्नात ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. मात्र पटकथेखेरीज इतर महत्त्वाच्या पुरस्कारांवर या चित्रपटाला मजल मारता आली नाही.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचे स्वरूप काहीसे ‘इंडिपेण्डण्ट स्पिरिट अवॉर्डस्’सारखे होते. गेली तीनचार वर्षे या दोन्ही पारितोषिकांचे निर्णय सारखेच असल्याचे दिसून आले आहे. जग नेटफ्लिक्समय झालेले असताना, अधिकाधिक जागतिक निर्मिती अनुभवत असताना या दोन्ही पुरस्कारांचे निकाल सारखे असणे, हे मनोरंजनातील बदल दाखवून देणारे आहे. आणखी एक मुद्दा यातून अधोरेखित होतो. तो म्हणजे युरोपीय, अमेरिकी विश्वाने ‘नंतर आलेल्या लोकां’चे ऋण मानणे. त्यामागे काही एक सामाजिक रेटा असेल. पण सर्व काही स्थानिक, भूमिपुत्रांचे अशा ‘आमचे आम्ही’ मानसिकतेची लाट जगभर दिसत असताना या कलाविश्वाने ती थोपवून धरणे हे आश्वासक ठरते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचेही पुरस्कार हा ‘नंतर आलेल्यां’चा गौरव ठरतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial on oscar awards 2021 abn

First published on: 27-04-2021 at 00:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×