scorecardresearch

मार्गारेट ते मर्केल

युरोपच्या संकुचित, वंशवादी राजकारणाचा चेहरा बदलण्याचे श्रेय निर्विवाद मर्केल यांचे.

राजकारण हे माणसांचे असते, याचा विसर मर्केल यांना कधीही पडला नाही. त्यांचे राजकारण प्रसंगी वादग्रस्त झाले असेल, पण ते कधीही भावनाशून्य झाले नाही.

‘वक्तृत्व ही कला वगैरे असेल पण; भावोत्कट भाषणे करून माणसांची मते बदलवण्याचा प्रयत्न करणे मला मान्य नाही. मी तसे कधीही केलेले नाही; करणारही नाही.’ असे मत जर्मन साप्ताहिक ‘डर स्पिगेल’ला दिलेल्या मुलाखतीत अँगेला मर्केल यांनी व्यक्त केले तेव्हा त्यांच्या राजवटीची तीन आवर्तने पार पडली होती. त्या वर्षी त्यांनी याच आपल्या मतास जागत चौथ्यांदा निवडणूक जिंकली आणि यानंतर पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आपल्या सर्वोच्च जर्मन सत्ताकारणास रविवारी पूर्णविराम दिला. आजचा सोमवार जर्मनीत आणि युरोपातही उजाडला असेल तो मर्केल यांच्यानंतर जर्मनीचे काय होणार यापेक्षाही युरोपचे काय होणार हा प्रश्न घेऊन. ऐंशीच्या दशकात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे वर्णन ‘ओन्ली मॅन इन ब्रिटिश कॅबिनेट’ असे केले जात असे. पुरुषी कर्तृत्वाचा फुकाचा दंभ त्यामागे आहे हे मान्य केले तरी त्यातून थॅचर यांच्या कणखर नेतृत्वाविषयी कौतुकमिश्रित आदरच त्यामागे होता. त्यांच्या राजवटीने ब्रिटनचा चेहरामोहरा बदलला. पण मर्केल यांच्या नेतृत्वाने मात्र युरोप बदलले. कर्तृत्वाच्या भ्रामक पुरुषी मापकांस एक स्त्री या नात्याने आपल्या नेतृत्वाने साग्रसंगीत मूठमाती देणाऱ्या मार्गारेट थॅचर आणि अँगेला मर्केल यांच्यात साम्य असले तरी ते तेथेच संपते. अनादी काळाच्या अनंत पटावर या दोघींचे मूल्यमापन पुढे होत राहील. पण सत्ताकारणापासून मर्केल स्वेच्छेने दूर होत असताना त्यांच्यामुळे जर्मनी आणि म्हणून युरोपने काय कमावले, या इतकेच त्यांच्या अनुपस्थितीने काय गमावले जाणार आहे याचा विचार व्हायला हवा.

युरोपच्या संकुचित, वंशवादी राजकारणाचा चेहरा बदलण्याचे श्रेय निर्विवाद मर्केल यांचे. आर्थिक सुधारणांच्या मुद्दय़ावर साशंक असणारे अमेरिकेचे तात्कालिक अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांना प्रसंगी जाहीर सुनावणाऱ्या थॅचर आणि प्रतिगामित्व पाजळणारे डोनाल्ड ट्रम्प यांना कानपिचक्या देण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या मर्केल यांच्यात साम्य खरेच. पण या साम्याचा आदर आणि कौतुक करताना ते कोठे संपते हेदेखील लक्षात घ्यायला हवे. मर्केल यांनी थॅचर यांच्याप्रमाणे आपले पोलादीपण सतत मिरवले नाही. थॅचर यांच्या कठोर व्यक्तिमत्त्वाचा कायम दरारा होता आणि सामान्य त्यांच्यापाशी जाण्यास कचरत. मर्केल यांच्याविषयी अनेकांस ममत्व होते आणि त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या क्षमतेने त्यांना कोरडे केले नव्हते. प्रसंगी सामान्य माणसाप्रमाणे आपल्या भावभावनांचे सार्वजनिक, पण संयत प्रकटीकरण मर्केल यांनी कधीही टाळले नाही. निर्णय घेण्याचा ‘तो’ क्षण सोडला तर मर्केल चॅन्सेलर असतानाही संपर्कशक्य, अ‍ॅप्रोचेबल वाटत. राजकारण हे माणसांचे असते आणि माणसांना भावभावना असतात याचा विसर मर्केल यांना कधीही पडला नाही. म्हणून त्यांचे राजकारण प्रसंगी वादग्रस्त झाले असेल पण ते कधीही भावनाशून्य झाले नाही.

म्हणूनच समस्त युरोपचे राजकारण ‘आमचे आम्ही’ आणि ‘आतल्या आत’ यात आनंद मानण्यात मश्गूल असताना मर्केल यांनी आपल्या देशाच्या सीमा स्थलांतरितांसाठी सताड उघडल्या. हा धक्का होता. वंशश्रेष्ठत्वाच्या गंडातून लाखोंचा जीव घेणारे ‘लोकप्रिय’ (?) नेतृत्व ज्या देशात निपजले त्या देशात असा सहिष्णू राजकारणी होणे आणि जनतेने त्यास आपल्या डोक्यावर घेणे ही साधी घटना नाही. मर्केल यांचा मोठेपणा असा की त्यांनी हे आपले पुरोगामित्वही मिरवले नाही. प्रतिगामी आपापल्या कोंडाळ्यांत विजयोत्सवी सोहळे करण्यात मग्न असताना पुरोगाम्यांचे समाजापासून तुटलेले बौद्धिक माध्यमी चातुर्य नैतिक विजयाचा भ्रम आणि दंभ तयार करते. पण तो आभास असतो. जनसामान्यांना पुरोगामित्वाकडे वळवण्यात खरे आव्हान, हे मर्म मर्केल यांनी ओळखले. म्हणूनच सलग दीड दशकांहून अधिक काळ त्या सत्तापदी राहू शकल्या. आणि म्हणूनच पूर्व आणि पश्चिम जर्मनीतील दुभंग संपवणाऱ्या हेल्मट कोहल यांच्याइतकेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्त्व युरोप आणि जर्मन यांच्यातील द्वंद्व संपुष्टात आणणाऱ्या मर्केल यांचे! ते त्यांचे मोठेपण!!

पण ती त्यांची मर्यादाही. मर्केल यांच्याविषयीचा सर्वात मोठा आक्षेप असा की त्यांनी स्थानिक आणि वैश्विक समस्यांना यशस्वीपणे रोखले. पण म्हणून त्या सोडवल्या असे नाही. सुमारे २७ देशांच्या युरोपीय संघटनेत एकात्मता साधणे निश्चितच सोपे नाही. ती मर्केल यांनी साध्य केली. पण म्हणून लहान लहान युरोपीय देशांस त्यांनी आपल्या पायावर उभे राहण्यास मदत केली असे नाही. मर्केल यांनी त्यांच्या समस्या आपल्या खांद्यावर पेलल्या. पण त्यामागे आधार होता अत्यंत सक्षम आणि समर्थ जर्मन अर्थव्यवस्थेचा. युरोपीय संघात राहणे ग्रीस वा पोर्तुगाल यांना परवडेनासे झाले तेव्हा उदार आर्थिक मदतीने मर्केल यांनी त्यांचा युरोपीय संघत्याग टाळला. पश्चिम आशियातून अनिर्बंध निर्वासितांना युरोपात येऊ देण्यास या व अन्य देशांचा विरोध होता तो त्यांच्या वंशवादी अधिक आणि आर्थिक कमी संकटाच्या भीतीमुळे. यातील पहिल्या मुद्दय़ाकडे मर्केल यांनी पूर्ण दुर्लक्ष केले वा तो चिरडला आणि दुसऱ्यासाठी आर्थिक मदत देऊ केली. पण त्यामुळे समस्या मिटली नाही. तसेच मर्केल यांची राजवट संपत येत असताना फ्रान्सला डावलून ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात जो करार झाला तोदेखील मर्केल यांच्या युरोपीय नेतृत्वाच्या मर्यादा दाखवून देणारा होता. वास्तविक ऑस्ट्रेलिया-ब्रिटन-अमेरिका यांच्यातील या पाणबुडी करारासाठी मर्केल यांना बोल लावणे योग्य नाही, हे खरे.

पण यातून मर्कोलोत्तर युरोप आणि जर्मनी यांच्यातील कच्चे दुवे पूर्णपणे उघडे पडतात हेही खरे. मर्केल यांनी १६ वर्षे सत्ता राबवली. या काळात त्या प्रथम जर्मनी आणि पुढे युरोप यांचा चेहरा बनून गेल्या. व्यवस्थाकेंद्री युरोपला अशा व्यक्तिकेंद्रित नेतृत्वाची नेहमीच काळजी वाटत आली आहे. त्यातही जर्मनीच्या व्यक्तिकेंद्रिततेचे कटू अनुभव जगाच्या आजही स्मरणात आहेत. अशा वेळी सामुदायिक नेतृत्व नाही तरी निदान आपल्या पक्षाची पुढची पिढी निर्माण करण्याचे प्रयत्न मर्केल यांनी करणे आवश्यक होते. ते झाले नाही. परिणामी त्यांचा पक्ष आणि एकूणच जर्मनी मर्केल यांच्यानंतर कोण आणि काय या प्रश्नाने हबकून गेलेला दिसतो. प्रतिगामी शक्ती डोके वर काढत असताना आणि जगभरातच त्यांची सरशी दिसत असताना जर्मनीने मर्केलोत्तर काळात असे उलटे वळण घेतले तर तो त्या देशाचा, आधुनिक युरोपचा आणि अंतिमत: मर्केल यांचाही पराभव असेल. हंगेरी, युरोप-आशियाच्या सीमेवरील टर्की, नेदरलॅण्ड, काही प्रमाणात स्वीडन आदी देशांत अशा मागास आणि अंतर्वक्र राजकारणास पाठिंबा मिळत असताना मर्केल यांचे नेतृत्व अस्तास गेलेले असेल. तसेच; मर्केल यांचे उदात्त विचार आणि त्यांना आचारात आणण्यातील अपयश हादेखील एक मुद्दा आहे. उदाहरणार्थ हेल्मेट कोहल यांच्या मंत्रिमंडळातील तरुण पर्यावरणमंत्री असल्यापासून मर्केल यांनी सातत्याने पर्यावरण आणि ऊर्जेची भूक याबाबत ज्वलनशील इंधनांविरोधात एक निश्चित भूमिका घेतली. पण पुढे २०१२ साली फुकुशिमा घडल्यानंतर उलट सर्व जर्मन अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली. आज त्या पायउतार होताना जर्मनी हा ऊर्जेसाठी युरोपात सर्वाधिक ज्वलनशील इंधन वापरणारा देश म्हणून ओळखला जातो. या मुद्दय़ावर आपण जरा अपयशीच ठरलो, अशी कबुली त्यांनी अलीकडेच दिली. हा त्यांच्या नेतृत्वातील गोडवा. सर्वोच्च नेतृत्वाने आपल्या चुका जाहीरपणे मान्य करण्यास सिंहाचे काळीज लागते. बरेचदा तसा आव आणणारे ससाहृदयीच निघतात. मर्केल यांचे तसे झाले नाही. त्या पेशाने क्वांटम फिजिसिस्ट. भौतिकशास्त्राची गूढगुपिते अभ्यासणाऱ्या. तुमच्या ज्ञानशाखेतील कोणते तत्त्व राजकारणास लागू पडते, असे अलीकडे त्यांना विचारले गेले. त्यावर त्यांनी क्षणार्धात दिलेले उत्तर होते: ‘विदाऊट मास, नो डेप्थ’. वस्तुमानाशिवाय खोली नाही, हे चिरंतन सत्य युरोपने केलेला मार्गारेट थॅचर ते अँगेला मर्केल हा प्रवास दाखवून देतो. एरवी तशी पोपटपंची आहेच.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: German elections 2021 europe most powerful woman margaret thatcher angela merkel zws