प्रत्येक समाजात स्वत:ला खास म्हणवून घेणारा एक वर्ग असतो. लोकशाहीचा उद्घोष करणाऱ्या काळातही हा वर्ग ठरविण्यासाठीच्या फूटपट्टय़ा जातीपातीकडून पैसा, बुद्धी अशा बदलत गेल्या; पण खास वर्ग आहेच. भारतीय शिक्षणव्यवस्थेत हा ‘खास वर्ग’ म्हणजे ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ या केंद्रीय शिक्षण संस्था. देशाला स्वावलंबी, सक्षम बनविण्यासाठी ताज्या दमाचे आणि धडाडीचे मनुष्यबळ देशांतर्गत शिक्षण संस्थांमधूनच निर्माण व्हायला हवे, या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीतून त्यांची निर्मिती झाली; परंतु नेमक्या याच शिक्षण संस्थांच्या प्रवेशांबाबत केंद्र सरकार व या संस्थांच्या धुरीणांकडून दूरदृष्टीचा अभाव दाखविला जातो आहे. विशेषत: आयआयटीच्या प्रवेशांबाबत जे काही धरसोडीचे निर्णय घेतले जात आहेत, त्यावरून तरी हीच गोष्ट अधोरेखित होते. ‘जेईई’ (जॉइंट एन्ट्रन्स एग्झाम) ही आयआयटीची सामायिक प्रवेश परीक्षा दरवर्षी एक नवा बदल घेऊन येते. पाच वर्षांपूर्वी शिकवणीचालकांचे वाढलेले प्रस्थ दूर करण्यासाठी जेईईबरोबरच बारावीच्या गुणांनाही महत्त्व देण्याचा विचार माजी केंद्रीय मनुष्यबळमंत्री कपिल सिबल यांच्या मनात तरळला. परंतु पुढे विविध शिक्षण मंडळांना एकाच फूटपट्टीत कसे मोजायचे, या व्यवहार्य विचारातून आयआयटींनीच तो धुडकावला. मग केंद्रीय मंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी बारावीच्या गुणांना अप्रत्यक्ष महत्त्व द्यायचे ठरले. जेईईचेही स्वरूप बदलून ती मुख्य (मेन) आणि प्रगत (अ‍ॅडव्हान्स) अशा दोन टप्प्यांत घेण्याचे ठरले. या बदलांमुळे, आयआयटी प्रवेशाचा ताण अभ्यासापेक्षा बदलत्या नियमांनीच वाढत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. आताही आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘नावीन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता तसेच वैज्ञानिक होण्याची योग्यता’ आहे की नाही, हे तपासण्याकरिता राष्ट्रीय स्तरावर ‘नॅशनल टेस्टिंग सव्‍‌र्हिस’ ही संस्था स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. मुंबईच्या आयआयटीचे माजी संचालक अशोक मिसरा यांच्या समितीने सुचविलेल्या या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची अभियोग्यता (अ‍ॅप्टिटय़ूड) तपासली जाईल. त्यातील चार लाख निवडक विद्यार्थ्यांनाच ‘जेईई’ देता येईल. वर्षांतून दोनदा ही परीक्षा घेण्याचा विचार आहे. सध्या तरी या संबंधात लोकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर ही चाचणी घ्यायची की नाही हे ठरेल. एकच समाधानाची बाब म्हणजे जे काही बदल होणार आहेत ते २०१७ ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पचवायचे आहेत. अर्थात जेईईसारख्या परीक्षांची तयारी विद्यार्थी शालेय पातळीवरच सुरू करतात. आता तर परीक्षा मंडळ निवडतानाही त्याची खबरदारी पालक घेताना दिसतात. मुळात, ‘अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षाच ‘नावीन्यपूर्ण विचार आणि संशोधन क्षमता’ जोखण्यासाठी म्हणून अस्तित्वात आली होती. त्यामुळे नव्या बदलांतून नेमके काय साधणार, हा प्रश्नच आहे. शिकवणी वर्गचालकांना तर या बदलांमध्येही ‘व्यवसायसंधी’ दिसू लागली आहे. कारण परीक्षेचे स्वरूप स्पष्ट असेल तर अभ्यासाची दिशा ठरविता येते; परंतु वारंवार बदलणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपामुळे विद्यार्थीही गोंधळून जातो. त्यात उखळ पांढरे होते ते कोचिंग क्लासेसचेच. राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावणारे उद्योग आयआयटीयन्सनी सुरू करावे ही किमान अपेक्षा. परंतु कोचिंग क्लासेसमधून होणाऱ्या नफ्याची गणिते आता खुद्द आयआयटीयन्सही मांडू लागले आहेत. थोडक्यात, ‘बदल’ हा उत्क्रांतीचा आधारभूत पाया असला तरी आयआयटी प्रवेशांबाबत त्याचे अजीर्ण झाले आहे.