जी-७ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद अमेरिकेत फ्लोरिडा राज्यातील गोल्फ रिसॉर्टमध्ये भरवण्याचे, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मनसुबे त्या देशातील सजग आणि सुजाण राज्यकर्त्यांनी उधळून लावले आहेत. फ्लोरिडा राज्यात मायामी शहरातील गोल्फ पर्यटनस्थळावर पुढील वर्षी ही परिषद आयोजित करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय वादग्रस्त होता की विनोदी, यावर अजूनही तेथील माध्यमांमध्ये खल सुरू आहे. पण असा प्रस्ताव कदापि स्वीकारार्ह नाही, असा नि:संदिग्ध निर्वाळा ट्रम्प यांच्या निकटवर्ती रिपब्लिकन सदस्यांनीही दिला होता. दोराल गोल्फ रिसॉर्ट नामे या प्रकल्पाची मालकी ट्रम्प यांच्या कुटुंबीयांकडे आहे. तेथे ट्रम्प यांच्यासह सात देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा आणि त्यांच्या असंख्य सहायकांचा, सल्लागारांचा पाहुणचार केल्याबद्दल ट्रम्प कुटुंबीयांना मोठा आर्थिक लाभ झाला असता. परंतु अमेरिकी अध्यक्ष हे त्यांच्या कार्यकाळात आर्थिक लाभार्थी बनू किंवा असू शकत नाहीत, असा स्पष्ट उल्लेख त्या देशाच्या राज्यघटनेत आहे. या तरतुदीची कल्पना ट्रम्प यांना नसली तरी त्यांच्या सल्लागारांना असायला हवी होती. त्यांनी व्हाइट हाऊसचे प्रमुख कारभारी मिक मुलवानी यांच्यामार्फत ट्रम्प समर्थक रिपब्लिकनांकडे चाचपणी करून पाहिली. मुलवानी यांची त्या वेळी या रिपब्लिकन लोकप्रतिनिधींसह कँप डेव्हिड येथे महत्त्वाची बैठक सुरू होती. ट्रम्प यांच्याविरोधात संभाव्य महाभियोगासह इतर महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा सुरू होती. तेथे उपस्थित सर्व रिपब्लिकन लोकप्रतिनिधींनी मायामीतील स्थळाला कडाडून विरोध केला. ट्रम्प यांच्यासाठी हा विरोध अनपेक्षित होता. डेमोक्रॅटिक सदस्य आणि ट्रम्प यांना ‘राष्ट्रविरोधी’ वाटणाऱ्या वृत्तमाध्यमांकडून तो होणार हे त्यांनी गृहीत धरले होते. मात्र, त्यांच्याच पक्षातील आणि त्यांचे समर्थक असलेल्या सदस्यांकडून झालेला विरोध ट्रम्प यांच्यासाठी धक्का होता. त्याच्या आदल्या दिवशी ट्रम्प यांच्या पसंतीच्या फॉक्स वृत्तवाहिनीनेही ट्रम्प यांच्या मालकीच्या पर्यटनस्थळी जी-७ शिखर परिषद भरविण्याला सौम्य शब्दांत का होईना, पण विरोध दर्शवला. आता रिपब्लिकनांकडूनही विरोध झाल्यामुळे ट्रम्प यांनी नेहमीच्या शैलीत ट्विटरवरून आपला निर्णय मागे घेतला. ते करत असताना सवयीप्रमाणे डेमोकॅट्र आणि वृत्तमाध्यमांवर विखारी टीकेचे सोपस्कार पार पडलेच! रिपब्लिकनांची कारणमीमांसा ट्रम्प यांच्याविषयीच्या सध्याच्या सार्वत्रिक भावनेविषयी खूप काही सांगून केली. ‘ट्रम्प यांच्या या कृतीचे समर्थन करणे विद्यमान परिस्थितीत अजिबात शक्य होणार नाही,’ असे रिपब्लिकन मंडळींनी निक्षून सांगितले. ट्रम्प यांना या स्थितीत तलवार म्यान करण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्थात ती किती काळ म्यान राहील हे सांगणे कठीण आहे. ट्रम्प यांना मुळातच बहुराष्ट्रीय संघटनांविषयी, त्यांच्या अस्तित्वाविषयी फार ममत्व नाहीच. जी-७, जी-२० यांच्या परिषदा किंवा संयुक्त राष्ट्रांची आमसभा वा सुरक्षा परिषद हे त्यांच्या दृष्टीने बहुधा सहल, पर्यटनाची स्थळे असावीत. त्यामुळेच आपल्या मालकीच्या एका गर्भश्रीमंत पर्यटनस्थळी जगातील श्रीमंत राष्ट्रांचे प्रमुख आले तर बिघडले कुठे, असा विचार त्यांनी केला असावा. निर्णयाभिमुख मुत्सद्देगिरी, आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा, बहुराष्ट्रीय किंवा द्विराष्ट्रीय मुद्दय़ांची उकल पर्यटनस्थळांवर राष्ट्रप्रमुखांच्या भेटीने होत नसते. अशा भेटीगाठींकडे गांभीर्याने पाहावे लागते. त्या बहुपदरी असाव्या लागतात. ट्रम्प यांची मानसिकता आणि तिला अनुसरून त्यांची धोरणे अमेरिकाकेंद्री नव्हे, तर अमेरिकामग्न बनलेली आहेत. पण त्यांच्या स्वप्नांतली महान अमेरिका पूर्वीही इतर राष्ट्रांच्या सहकार्याविना बनलेली नव्हती. आता तर असे स्वप्न बाळगणे आणि ते विकणे हाच वेडगळपणा आहे. तो ठायी असलेली व्यक्ती अमेरिकेची अध्यक्ष असणे ही शोकान्तिका आहे की विनोद, हे ज्याचे त्याने ठरवावे!