ब्रिटनमधल्या विल्यम शेक्सपिअरचा अजरामर ‘हॅम्लेट’ अनेकांना माहीत आहे. त्यानं अनेक ज्येष्ठांना आनंद दिलाय, पण दुसऱ्या विल्यमचं ‘हॅम्लेज’ अनेकांना माहीत नाही. त्यानंही अनेकांच्या मोठेपणाचा रस्ता समृद्ध केलाय..
लंडनला नेहमी ज्यांचं जाणं असेल आणि यादीतलं पर्यटन ज्यांचं पूर्ण झालं असेल, त्यांना हे लगेच कळेल. निवांत भटकंतीसाठी ऑक्स्फर्ड स्ट्रीटसारखी राजस जागा जगात दुसरी कोणती नाही.
न्यूयॉर्कला पार्क अ‍ॅव्हेन्यू, वॉल स्ट्रीट वगरे रस्ते आहेत, पण तिथे सगळे आपले याच्यात. तिथल्या भटकंतीला संपत्तीची ऊब असावी लागते आणि दुसरं म्हणजे न्यूयॉर्कमधली भटकंती ही केवळ धंदे की बात असते. वॉशिंग्टन आपल्याला विचारतच नाही. व्हेनिस अथवा मिलान सुंदर आहे, पण चित्रप्रदर्शनं नसतील तर तिथल्या भटकंतीत बौद्धिक असं काही नाही. इस्तंबूलमध्ये अशा भटकंतीचा आनंद आहे, पण तिथे आपणही एकसारख्या रंगातले टीशर्ट घालून, एकाच रंगाच्या बॅगा गळ्यात वागवत समूह पर्यटन करणाऱ्यांपकी आहोत की काय असं वाटायला लागतं. तिथं तो क्लास नाही.
ऑक्सफर्ड स्ट्रीटला तो आहे. इथं सगळंच आहे.
टॉटनहॅम कोर्ट रोड स्टेशनला उतरायचं आणि उलटं चालत निघायचं. साधारण १०० पावलांना एक तास लागेल इतका निवांत चालण्याचा आनंद या रस्त्यावर आहे. काहीही घ्यायचं नसलं तरी पाहायलाच हवीत अशी दुकानं. पुढे काही तरी घ्यायलाच हवं अशी पुस्तकांची दुकानं. बाहेर पुस्तक हारीनं मांडून ठेवलेली. कधी तरी कोणी तरी एखादा महनीय लेखक त्या दुकानात आलेला असतो. रस्त्याच्या दुतर्फा अशीच प्रेक्षणीय दुकानं. मध्येच कॉफी शॉप. पुस्तकाच्या दुकानातनं पुस्तक घ्यायचं, कॉफी घ्यायची आणि कोपऱ्यातल्या बाकावर बसून त्या रसरशीत, वाहत्या रस्त्याच्या साक्षीनं त्या अनाघ्रात पुस्तकाला माणसावळायचं. काय आनंद आहे. तर असंच चालत राहिलं तर ऑक्स्फर्ड स्ट्रीट संपतो. सर्वसाधारण पर्यटक म्हणवून घेणारा इथे वळतो. परतीच्या प्रवासाला निघतो.
तर तसं करायचं नाही. ऑक्सफर्ड स्ट्रीट स्टेशनचा बोर्ड दिसला की उजवीकडे वळायचं. हा रिजंट्स स्ट्रीट. तो पिकॅडली सर्कस स्टेशनकडे जातो. त्याच रस्त्यावर चालत राहायचं. साधारण अर्धा रस्ता पार केला की उजव्या हाताला थांबायचं. हे दुसरं, चोखंदळांनी जायलाच हवं असं गंतव्य स्थान. लालसर रंगाच्या पडद्यांवर पांढऱ्या रंगातल्या अक्षरांनी त्याचं नाव लिहिलेलं दिसेल.
हॅम्लेज.
हे खेळण्याचं दुकान. फक्त खेळण्यांचं. केवढं मोठं? तर थेट सात मजली.
मराठी संस्कारात खेळण्याच्या दुकानांना मोठी माणसं फारच लहान लेखतात. त्यांना वाटतं हे काय.. हे तर पोराबाळांसाठी.. आपल्यासारख्या पोक्तांपुढे काय त्याचं एवढं कौतुक? तर असं ज्यांना वाटतं आणि ज्यांना वाटत नाही अशा दोघांनी पोराबाळांसकट किंवा पोराबाळांशिवाय हाती जमेल तितका वेळ ठेवून जायलाच हवं अशी जागा म्हणजे हॅम्लेज.
विल्यम हॅम्लेज या जातिवंत ब्रिटिश सद्गृहस्थाची ही निर्मिती. विल्यम हा त्या वेळी कामगार झाला असता किंवा बोटीवरचा खलाशी, पण त्याला वाटलं आपण काही तरी वेगळं करावं. म्हणून त्यानं हे खेळण्यांचं दुकान काढलं. कधी? तर १७६० साली. म्हणजे आपल्याकडे पानिपताच्या लढाईला आणि माधवराव पेशवे सत्तेवर यायला आणखी एक वर्ष होतं.. थोरले बाजीराव जाऊन वीस र्वष झाली होती त्या वेळी विल्यमनं खेळण्याचं दुकान काढलं. नोहाच्या नौकेसारखी एक बोट बनवली आणि जमेल तितकी खेळणी त्यात कोंबून तो ती विकायला लागला. बघता बघता त्याचं हे खेळण्याचं दुकान चच्रेचा विषय झालं. त्या वेळी त्याला विल्यमचं आनंदनिधान असं म्हटलं जाई. कुटुंबच्या कुटुंब घरातल्या लहानांना घेऊन त्याच्या दुकानाला भेट देत. १८३७ साली व्हिक्टोरिया राणीचं राज्यारोहण झालं त्या वेळी या दुकानाचा लौकिक राजघराण्यापर्यंत गेलेला होता. नंतर एकदा खुद्द राणी या दुकानात आली होती.
१८८१ साली या दुकानानं आमची कोठेही शाखा नाही असं न म्हणता एक नवी जागा घेतली. तेच हे रिजंट स्ट्रीटवरचं भव्य दुकान. त्या वेळी ते पाच मजली होतं. आता त्याचे दोन मजले वाढलेत. म्हणजे आपल्याकडे नसेल एक वेळ, पण जगात मोठी माणसं लहानांच्या खेळण्यांना पुरेशा गांभीर्यानं घेतात, त्याचंच हे लक्षण. नव्या शतकाच्या सुरुवातीलाच जगातल्या अनेक आस्थापनांप्रमाणे हॅम्लेजलाही चांगलाच फटका बसला. पहिल्या महायुद्धानं हॅम्लेजचं कंबरडंच मोडलं.
युद्ध माणसांना म्हातारं बनवतं. पहिल्या महायुद्धानं आलेलं म्हातारपण जायच्या आत दुसरं महायुद्ध आलं. हॅम्लेजची वाताहतच झाली. मोठे राहतायत की जगतायत याचाच प्रश्न असताना लहानांच्या खेळण्यांच्या दुकानांना कोण विचारतंय? तसं काही काळ झालं खरं. दुकानावर पाच वेळा बॉम्ब पडले होते. ते आतनं कोसळलं होतं, पण त्याही वेळी दुकानातले विक्रेते डोक्यावर पत्र्याच्या टोप्या घालून बाहेर उभं राहून मुलांसाठी खेळणी विकायचे, पण आíथकदृष्टय़ा काही काळ हाल झाले ते दुकान चालवणाऱ्यांचे. त्या काळी दुकानात नोंदवलेली खेळण्यांची मागणी घरपोच पाठवली जायची. त्यासाठी दोन घोडय़ांच्या बग्ग्या होत्या हॅम्लेजकडे. किती छान वाटत असेल मुलांना.. छान सजवलेल्या घोडय़ांच्या बग्गीतून आपली खेळणी घरी येतायत, पण महायुद्धानंतर ही चन सोडावी लागली हॅम्लेजला. कर्जाचा डोंगर वाढला. ऐन महायुद्धाच्या काळात वॉल्टर लाइन्स या दुसऱ्या उद्योगपतीनं हॅम्लेज विकत घेतलं. त्याचं कौतुक आणखी एका कारणासाठी.. म्हणजे त्यानं दुकानाचं नाव नाही बदललं. हॅम्लेजच ठेवलं. त्याही काळात दुसरी एलिझाबेथ राणी दुकानात खेळणी घ्यायला आल्याची नोंद आहे. १९५५ साली राणीनं दुकानाचा शाही गौरव केला. एका खेळण्याच्या दुकानाचा मोठय़ांकडून इतका मोठा गौरव झाल्याची नोंद दुसरीकडे कुठे नसेल. हॅम्लेजचं नाव सर्वतोमुखी झालं.
तेच ते हे रिजंट स्ट्रीटवरचं दुकान. सात मजली. जवळपास ३५ हजारांहून अधिक खेळणी आहेत या दुकानात. ती बघणं, ती बघायला, विकत घ्यायला आलेल्या पोरांना बघणं आणि अतिशय उत्साहात ती दाखवणाऱ्या विक्रेत्यांनाही बघणं.. हे सगळंच विलक्षण आनंददायी आहे. ब्रिटनला ग्रेट करणारे जे काही मानिबदू आहेत त्यातला हा एक. ब्रिटनमधल्या विल्यम शेक्सपिअरचा अजरामर ‘हॅम्लेट’ अनेकांना माहीत आहे. त्यानं अनेक ज्येष्ठांना आनंद दिलाय, पण दुसऱ्या विल्यमचं हे ‘हॅम्लेज’ अनेकांना माहीत नाही. त्यानंही अनेकांच्या मोठेपणाचा रस्ता समृद्ध केलाय.
पण ही हॅम्लेज कहाणी आताच सांगायचं प्रयोजन काय?
तर गेल्याच आठवडय़ात या हॅम्लेजची मालकी ब्रिटिशांकडून गेलीये. एका चिनी उद्योगपतीनं ते विकत घेतलंय. हा उद्योगपती कसला? तर पादत्राणं बनवणारा. त्यानं १० कोटी पौंड मोजून हॅम्लेज विकत घेतलं. एका पौंडाची किंमत साधारण ९५ रुपयांच्या आसपास आहे. त्यावरून या दुकानाचं मोल लक्षात येईल. तर अशा तऱ्हेने ब्रिटिशांचा हा तब्बल २५५ हून अधिक वर्षांचा जुना खेळकर वारसा आता संपुष्टात आलाय. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग नुकतेच ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी काही महत्त्वाचे व्यापार करार झाले. त्यातला एक हा. हॅम्लेजला विकून टाकणारा.
पण प्रश्न फक्त हॅम्लेज या एकाच दुकानाचा, एका आगळ्या, लोभस ब्रँडचा नाही, तर युरोपातले एकापेक्षा एक ब्रँड कसे चीनशरण होतायत, त्याचा आहे. इटलीतली जगद्विख्यात टायर कंपनी पायरेली ही आता चीनची झालीय. इटलीतलीच फेरेटी ही जगातली लोकप्रिय अशी श्रीमंती खासगी नौका.. याट.. बनवणारी कंपनी. ती आता चिनी उद्योगाचा भाग आहे. फ्रान्समधला टोलूज विमानतळ चिनी कंपनीनं घेतलाय. त्याच देशातली प्युजो स्रिटेन ही मोटार कंपनी चिनी झालीय. स्वीडन ओळखला जात होता वोल्वो ब्रॅण्ड मोटारींसाठी. या कंपनीवरसुद्धा आता चीनची मालकी आहे. इतकंच काय युरोपातले अगदी ऑलिव्ह तेलाचे किंवा फॅशनचेसुद्धा अनेक ब्रॅण्ड्स आता चीनच्या ताब्यात गेलेत.
अमेरिकी कंपन्या अशा सहजासहजी विकल्या जात नाहीत. आपण कोणाकडे जातोय याबाबत अमेरिका जागरूक असते. जर्मनी स्वत:च स्वत:च्या ब्रॅण्ड प्रेमात आहे. त्यामुळे त्या कंपन्याही सहजासहजी विकल्या जात नाहीत. युरोपातल्या अन्य कंपन्यांचं मात्र तसं नाही. युरोपियनांच्या मनाच्या.. आणि म्हणूनच व्यापार-उदिमाच्या.. मोकळेपणाचा फायदा चीन हा असा उचलू लागलाय.
अशा वेळी काय फक्त ‘कालाय तस्म नम:’ इतकंच म्हणायचं असतं? याचं उत्तरही काळच देईल, पण तोपर्यंत विल्यमच्या हॅम्लेजचं हे आनंदस्मरण. लंडनला जाऊन ते करता येत नसेल तर मुंबई, ठाण्यात आता हॅम्लेजची दुकानं उघडली आहेत तिथं जाऊन करावं. मुलाबाळांना घेऊन जावं. अन्यथा आपल्या.. ‘करि मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे..’ या वचनाला काय अर्थ आहे?
girish.kuber@expressindia.com
@girishkuber