सिटी बँकेनं एक अहवाल तयार केलाय. या अहवालाला जागतिक बँकेनं आपलं म्हटलंय. म्हणजे त्याला एक पावित्र्य आहे. म्हणूनच तो गंभीरपणे घ्यायला हवा.. दुसरीकडे  विवेक वाध्वा यांच्यासारखा जागतिक दर्जाचा अभ्यासक आपल्याला सांगतोय, जग आता एका नव्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठय़ावर आहे.

या क्रांतीमुळे  जगभरात काय घडू शकेल ?

bajarang puniya
जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग निलंबित; उत्तेजक चाचणीस नकार दिल्यामुळे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’कडून कारवाई
Tata Nifty Auto Index Fund,
वाढत्या वाहन उद्योगाचा लाभार्थी
SEBI approval of ICRA subsidiary for ESG rating
ईएसजी’ मानांकनासाठी इक्राच्या उपकंपनीला सेबीची मान्यता
Apple plans to make iPads attractive again give the iPad Pro and iPad Air tablet a makeover On Seven May
Apple आयपॅड पुन्हा होणार स्टेटस सिम्बॉल; मोठा डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, कंपनी ‘या’ दिवशी करणार घोषणा
One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर
rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!

आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा किती वेगात पळतोय याची चर्चा आजकाल सारखी सुरू असते. एक म्हणतो आपण ७.५ टक्के इतक्या वेगानं वाढतोय, तर दुसरा तो मुद्दा खोडून काढतो. त्याच्या मते ही वाढ मोजण्याचे निकषच बदलले गेल्यामुळे आपण ७.५ टक्क्यानं वाढतोय असा भास होतोय. प्रत्यक्षात आपल्या वाढीचा वेग इतका नाहीये.. वगैरे वगैरे.

या सर्व परस्परविरोधी मतवाल्यांचं एका मुद्दय़ावर मात्र एकमत दिसतं. ते म्हणजे वाढत नसलेले रोजगार. हा रोजगाराचा मुद्दा आला की अर्थव्यवस्था वाढीच्या गतीवर मतभिन्नता असलेले एकदम समेवर येतात. त्यानंतर बऱ्याचदा या दोन्ही गटांचा प्रवास एकाच मार्गावर सुरू राहतो. तो म्हणजे अर्थव्यवस्था वाढतीये, पण रोजगारनिर्मिती ठप्प आहे. त्यातून एक मुद्दा हमखास समोर येतो. आपण रोजगारशून्य विकासाच्या दिशेनं निघालोय का? अर्थव्यवस्था वाढणार पण रोजगारांची संख्या त्या गतीनं वाढू शकणार नाही. कारणं काहीही असतील त्यामागची. पण या दोन्हीतलं वास्तव एकच. जॉबलेस ग्रोथ.

पण ही सगळी चर्चा एकाच मुद्दय़ाभोवती फिरतीये. आर्थिक विकास होतोय पण रोजगार तयार होत नाहीयेत, हा तो मुद्दा. त्यात काही गैर आहे असेही नाही. मुद्दा खरा आहे आणि तपशीलदेखील बरोबर आहे. पण याला जोडणारा आणखी एक मुद्दा हे वास्तव आता बदलून टाकू लागलाय. मोठय़ा प्रमाणावर बदल यामुळे होतोय. पण आपल्याकडे या तिसऱ्या घटकाचा उल्लेखदेखील अजून होत नाहीये. तो समजा कोणी केलाच तर आपली प्रतिक्रिया काय.. छे.. हा घटक काही आपल्याला लागू नाही.. तिकडे इंग्लंड- अमेरिकेत ठीक आहे हे.. अशी.

हा तिसरा घटक म्हणजे  रोबो. यंत्रमानव.

गेल्या आठवडय़ात जपानमध्ये आणखी एक हॉटेल सुरू झालं. विनाकर्मचारी. त्यात सर्वच्या सर्व कामं यंत्रमानवाकडनं होतात. म्हणजे आपण आत गेलो की स्वागत करायला रोबो. आपल्या बॅगा उचलायला रोबो. आपल्या खोलीपर्यंत पोचवायला रोबो. खोलीत गेल्यावर आपला मदतनीस रोबो. टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर काय आहे, हे तो सांगणार. सकाळी पाहिजे त्या वेळेला आपल्याला उठवणार. इतकंच काय जिकडे जायचंय तिकडे पोहोचवण्यासाठी टॅक्सीही तोच बोलावणार.

याआधी गेल्या वर्षी नागासाकीत पहिलं असं पूर्ण रोबोटिक्सचलित हॉटेल सुरू झालंय. हे पाहून अन्य हॉटेलवाले म्हणायला लागलेत, आम्हीही आता जास्तीत जास्त कामं रोबोकडूनच करून घेणार. अनेक कंपन्यांनी या अशा विशिष्ट कामासाठी लागणारे रोबो बनवून द्यायची, रोबो पुरवायची व्यवस्था केलीये.

दोन दिवसांपूर्वी सॉफ्ट बँक या नावाच्या बँकेनं रोबो वापरण्याची घोषणा केलीये. (आपल्याला हा रोबोबदल कदाचित जाणवणार नाही. कारण नाही तरी आपल्याकडे बरेच बँक कर्मचारी आपल्याशी तसे यंत्रमानवाप्रमाणेच वागत असतात. असो.) वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये या बँकेच्या रोबो योजनांची सविस्तर माहिती आलीये. याखेरीज या कंपनीनं माहिती साठवून ठेवणाऱ्या चिप्स बनवणारी कंपनीदेखील विकत घेतलीये. त्यामागचं कारण सांगताना या बँकेनं सांगितलं की पुढच्या काही वर्षांत आपण वापरतो त्या सर्व उपकरणांना असे स्मृतिकोश असतील. विजेचे बल्ब, रेफ्रिजरेटर वगैरे. त्याद्वारे ही उपकरणं सतत आपल्या संपर्कात असतील. खेरीज होंडा कंपनीशीही या बँकेनं हातमिळवणी केलीये. चालकरहित मोटारी विकसित करणं हा उद्देश यामागचा.

अमेरिकेत काही महत्त्वाच्या रुग्णालयांत काही विशिष्ट रुग्णांच्या देखभालीसाठी आता रोबो ठेवले जातात. कोणते हे विशिष्ट रुग्ण? हे विशिष्ट रुग्ण म्हणजे मुलं. स्वमग्न मुलं. अशा मुलांना माणसाळवायला माणसांपेक्षा रोबो जास्त उपयोगी ठरतात, असं अनेक प्रयोगांत सिद्ध झालंय. हे रोबो अशा मुलांच्या कलाकलानं घेतात. ते म्हणतील ते ऐकतात. त्यांच्या तालावर नाचतात. या दोघांत काही काळानं संबंध जुळले की मग रोबो या मुलांकडून काय काय करून घ्यायला लागतो. पुढची अवस्था म्हणजे एक रोबो आणि दोन मुलं. आणि नंतर रोबो नाहीच. या कथा वाचून काही म्हणतील, हे काय सगळं तिकडचं? आपल्याला काय कारण फिकीर करायचं?

आपल्याकडे जवळपास सर्वच मोटारनिर्मिती कंपन्यांत वारंवार करायच्या कामांसाठी रोबो वापरले जाऊ लागलेत, त्याला आता बराच काळ लोटला. मोटारीच्या तळाची यंत्रसामग्री बसवणं म्हणजे कंबरडं मोडून घेणं असे. पण आता हे चित्र बदललंय. कारण ही कामं आता रोबो करू लागलेत.

पण हे आताच अचानक रोबोपुराण कशासाठी?

सिटी बँकेनं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं एक अहवाल तयार केलाय. अलीकडेच तो हाती लागला. अहवालाचा विषय आहे रोबोंमुळे कोणाकोणाच्या रोजगारांवर गदा येईल? बीबीसीनं यानिमित्तानं आपल्या वेबसाइटवर एक गंमतच सुरू केलीये. या वेबसाइटच्या संबंधित भागात आपण जायचं आणि संगणकाला आपण काय करतोय त्याची माहिती द्यायची. मग समोरचा संगणक आपला रोजगार रोबो हिरावून घेतील का? घेणार असले तर कधी? वगैरे माहिती देतो. यातला मनोरंजनाचा भाग ठीक. पण बँकेचा अहवाल मात्र गंभीरपणे घ्यायला हवा.

त्यात एक विभाग आहे. कोणकोणत्या देशातले किती किती रोजगार या रोबोंच्या हाती जातील याचा अंदाज या कक्षात मिळतो. या अहवालानुसार इंग्लंडमधले ३५ टक्के रोजगार मानवाकडून यंत्रमानव हिसकावून घेतील. अमेरिकेमध्ये हे प्रमाण ४७ टक्के इतके असेल. दक्षिण आफ्रिकेतले पुढच्या काळातले ६६ टक्के इतके रोजगार यंत्रमानवाच्या हाती जातील असे हा अहवाल सांगतो आणि थायलंडसारख्या चिमुकल्या देशात तब्बल ७२ टक्के नोकऱ्या या पुढच्या काळात यंत्रमानव करू लागतील. असंच काहीसं प्रमाण चीनसंदर्भातही आहे. त्या देशातही मोठय़ा प्रमाणावर मानवी नोकऱ्यांच्या जागा यंत्रमानवांमधून भरल्या जातील. आणि आपण? भारतातल्या थेट ६९ टक्के इतक्या नोकऱ्यांवर यंत्रमानवांमुळे गदा येईल, असं या अहवालाचं भाकीत आहे.

सिटी बँकेच्या या अहवालाला जागतिक बँकेनं आपलं म्हटलंय. म्हणजे त्याला एक पावित्र्य आहे. म्हणूनच तो गंभीरपणे घ्यायला हवा.

अशासाठी की मेक इन इंडिया वगैरेसारख्या योजनांमधून आपण आता नव्या औद्योगिक गतीची आस लावून बसलोय. आणि जे काही आपल्या हाती पडू शकेल ते यंत्रमानवच घेऊन जायची भीती आहे. ती अनाठायी नाही. अमेरिकेतला स्टॅनफर्ड विद्यापीठातला विवेक वाध्वा यांच्यासारखा जागतिक दर्जाचा अभ्यासक आपल्याला सांगतोय, जग आता एका नव्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठय़ावर आहे. पण या क्रांतीला मानवी सहभागाची गरज असणार नाही. ही औद्योगिक क्रांती यंत्रमानवांची असेल.

तेव्हा या मानवी उपयुक्ततेला पर्याय देणारी व्यवस्था हाताळायची कशी यासाठी अनेक देशांत अभ्यास सुरू झालाय. आपल्याला मात्र अजून जाग यायची आहे. ती लवकर यायला हवी. कारण या तरुणांच्या देशात रोजगाराभिमुख तरुणांची पोटं भरायची तर महिन्याला किमान १० लाख नवे रोजगार तयार व्हायला हवेत, असं सरकारच सांगतं. प्रश्न फक्त इतकाच की यात यंत्रमानवाचा वाटा किती?

 

गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
twitter ; @girishkuber